Sunday, April 2, 2017

आदिम हिंदू परिषद


Image may contain: night

आदिम हिंदू- सिंधूपुर्व काळापासून भारतीय संस्कृतीचे रचनाकार, आदिशिव-शक्ती आणि अन्य लोकदैवतांची प्राचीन काळापासून आराधना करणारे, प्राचीन काळापासून समतेच्या आगमिक (तंत्रशास्त्रांच्या) तत्वांवर चालणारे, सांख्य/वैशेषिक/योग व चार्वाक दर्शनांना व त्या आधारित उपनिषदांना तत्वज्ञानाचा मूख्य स्त्रोत मानणारे, स्त्री-स्वातंत्र्याला पुरातन काळापासून व्यवहारातही पाठिंबा देणारे सर्व आदिम हिंदू असून आजचा हिंदू धर्म त्यांच्यामुळेच बनलेला आहे. या सर्व लोकांना आम्ही आदिम हिंदू समजतो. यात आजच्या वैदिक वगळता सर्व हिंदू जाती-जमाती सर्व-समानतेच्या तत्वावर एकमेकांच्या हितासाठी कार्य करत एकमेकांचा सन्मान करतील व एके दिवशी अंतर्गत जाती नष्ट करण्याचा प्रयत्न करतील.


वेद, वेदोक्त संस्कार, वेदाधारित कर्मकांडे (उदा. यज्ञ) यांचा जन्मजात अधिकार असणारे अथवा वेदप्रामाण्य, वर्णाश्रम व्यवस्था मानणारे हे वैदिक धर्मिय असून त्यांचा आदिम हिंदू समाजाशी काहीही संबंध नाही.

उद्दिष्ट: हिंदू धर्माचे तत्वज्ञान स्वतंत्र करणे, हिंदुंचा इतिहास हिंदुंच्या दृष्टीकोणातून मांडणे, हिंदू धर्माचे वैदिकीकरण करु पाहणा-या संघटना/व्यक्ती यांचा सातत्याने तात्विक विरोध करत रहात हिंदुंचे स्वातंत्र्य जपत हिंदुंच्या ऐहिक कल्याणासाठी समतेच्या तत्वावर प्रयत्नरत राहणे. यासाठी आवश्यक ग्रंथ व नियतकालीकांचे प्रकाशन करणे व जनजागृती करत खरा धर्म समजावून सांगत हिंदू धर्मात गैरसमजातून वा अपप्रचारातून घुसलेली वैदिक मुलतत्वे दूर हटवणे ही या परिषदेची प्रधान उद्दिष्टे असतील. ही परिषद निखळ ज्ञानाधारित व तथ्यपूर्ण इतिहासावर आधारित असून कोणाचाही द्वेष करण्याचे काम या परिषदेकडून व तिच्या सदस्यांकडून होणार नाही.

-आदिम हिंदू परिषद


No comments: