Monday, April 10, 2017

हिंदुंचा एल्गार!

बहुजनीय म्हणवणा-या चळवळीतील विचारवंतांचे अपयश हे होते कि त्यांनीही सर्व परंपरा ब्राह्मणी मानल्या आणि नाकारल्या. त्यांनी ब्राह्मण शब्द घेतला पण त्यांचेच सगे वैदिक क्षत्रीय आणि वैश्य सोडून दिले. या तीन वर्णांचा वैदिक धर्म होतो हे त्यांनी लक्षात घेतले नाही. जर ब्राह्मण वाईट असतील तर स्वत:ला क्षत्रीय-वैश्य समजणारे कमी वाईट नव्हते. 

वैदिक परंपरेपक्षा सबळ परंपरा पार सिंधूपुर्व काळापासून हिंदुंना लाभली आहे आणि हे दोन वेगळे धर्म आहेत हेही त्यांनी लक्षात घेतले नाही. परंपरा-संस्कृती नाकारल्याने असे चित्र निर्माण झाले कि जणू काही या कथित बहुजनांना संस्कृतीच नव्हती आणि त्यांचा इतिहास गुलामीचा आहे. धर्मच नीट समजावून न घेतल्याने हिंदु धर्माला आणि ब्राह्मणांना शिव्या द्यायची नवी शिवी-संस्कृती मात्र निर्माण केली. त्यामुळे ही चळवळ अपयशी ठरली जे होणारच होते!

देव-धर्मापार जाणे हे एक समस्त मानवजातीचे ध्येय जरी असले तरी जे बाहेर पडताहेत त्यांना आपण  नेमके कशाच्या पार जातो आहे हे तरी माहित पाहिजे. इतिहास-संस्कृती व परंपरा यांचे ठळक भान नसेल तर सामाजिक प्राणी असलेला मनुष्य हा संभ्रमितच राहतो आणी अशी माणसे जीवनात फारशी यशस्वी होत नाहीत. सामान्य माणसासाठी तर धर्म हा एक मानसिक आधार असतो. तो आधार हिरावून घेता येत नाही. पण त्याला त्याचा धर्म नीट माहित असलाच पाहिजे. वैदिक धर्मामुळे दहाव्या शतकानंतर हिंदुंवर न्युनगंडाचे गहन सावट पडले. इतके कि संतही त्या सावटातून सुटले नाहीत. याचा परिणाम त्यांचे तत्वज्ञानही इहवादी न बनता प्राय: परलोकवादी होण्यात झाला. सामाजिक व सांस्कृतिक फेरमांडणी करत वैदिक कचाट्यातून सुटण्याचे प्रयत्न झाले नाहीत. वैदिकांत संत अपवादानेच झाले पण वैदिक धर्म-मार्तंडांनी समाजाची मानसिकता आपल्याच कचाट्यात ठेवण्यात अभूतपुर्व यश मिळवले. आजही स्थिती फारशी बदललेली नाही. हे सारे वैदिक हे हिंदू धर्माच्या आवरणाखाली वावरत असल्याने घडले.

एप्रील २००६ मध्ये किस्त्रीममधील एका प्रदिर्घ लेखात आणि "हिंदू धर्माचे शैव रहस्य" या पुस्तकातून मी सर्वप्रथम वैदिक आणि हिंदू हे वेगळे धर्म असल्याचे दाखवून दिले. या पुस्तकाच्या नंतर तीन आवृत्त्या झाल्या. यात माहितीची भर पडत राहिल्याने आता नवेच पुस्तक लिहित आहे. "असूरवेद" कादंबरीनेही जनसामान्यांपर्यंत हा धार्मिक भेद नेण्यात हातभार लावला. त्यावर नाटक येवुन राज्य नाट्य स्पर्धेतही पहिले पारितोषिक मिळाले. सुनील हरिश्चंद्रांसारख्या नाट्यसंहिता-लेखक व दिग्दर्शकाचा त्यात मोलाचा वाटा होता. इंग्रजीतही "Origins of the Vedic Religion & Indus-Ghaggar Civilisation" दोन वर्षांपुर्वीच प्रसिद्ध झाले. मायकेल विट्झेल, वेंडी डोनिजर, एडविन ब्रायंटसारख्या इंडोलोजीतील जागतिक किर्तीच्या विद्वानांनीही त्याची दखल घेतली. आताच संजय क्षीरसागरांनीही मनुस्मृती ही केवळ वैदिक धर्मियांपुरती कशी मर्यादित होती, हिंदुंसाठी ती मुळात लिहिलीच गेली नव्हती हे मनुस्मृतीतीलच पुराव्यांधारे सिद्ध करणारे मोलाचे पुस्तक लिहिले आहे. भविष्यात शेकडो संस्कृती-अभ्यासक विद्वान लिहित राहतील व सर्वसामान्य हिंदुंचे डोळे उघडत, त्यांच्यातील न्युनगंडाची भावना समूळ नष्ट करत अभिमानाने उभे करण्यात मदत करतील यावर माझा विश्वास आहे. हिंदुंची प्रगती त्यातच सामावली आहे. 

हा आत्मभान मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. वैदिक धर्मियांचा द्वेष करण्याचे काहीएक कारण नाही. जे कट्टर वैदिक आहेत ते आजही हिंदुंना टाचेखाली ठेवण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. आपला वैचारिक संघर्ष त्यांच्याशी आहे. आम्ही कोणाचे वर्चस्व सहन करणार नाही आणि कोणावरही वर्चस्व गाजवनार नाही हाच आदिम हिंदू परिषदेचा मुलमंत्र आहे. जी जी आमच्या धर्मात वैदिक तत्वे घुसली आहेत ती  मात्र हटवली जात राहील हे मात्र नक्की. त्यांनी त्यांचा धर्म अवश्य पाळावा पण आमच्या धर्मात कोणाची लुडबुड नको. आम्ही वकीलपत्र दिले नसतांना हिंदुंच्या नांवे "फतवे" काढण्याचा या वैदिकवाद्यांना काय अधिकार? आम्ही तो अधिकार नाकारतो. दावणीचे बैल होण्याचे नाकारतो. 

जे जे सज्जन आहेत, मानवतावादी आहेत...मग ते कोणत्याही धर्मातील असोत, आम्हाला वंदनीयच आहेत. जे जे मानवताविरोधी आहे त्याचा धि:कार आम्ही, आमच्या धर्मातील असला तरी, करत राहू!

हिंदुंचे सळसळते, चैतन्याने भरलेले सर्जक जग पुन्हा निर्माण करु!
-संजय सोनवणी


No comments: