Monday, April 17, 2017

भारतकथा वैदिक आगमनापुर्वीची!

मुळात मूळ भारतकथा घडली तेंव्हा वैदिक भारतात प्रवेशलेही असण्याचे शक्यता नाही. कारण महाभारताच्या बीजकथेत जी सामाजिक स्थिती आहे तशी स्थिती वैदिकांत असल्याचे कसलेही सूचन नाही.

उदा.: १. पाच भावांनी एका स्त्रीशी लग्न करणे या प्रर्थेचा दुरान्वयानेही वैदिक साहित्यात निर्देश नाही.

२. वैदिकांत वर्णसंकर हा गहन चिंतेचा विषय होता. वर्णसंकर होऊ नये म्हणून प्रचंड बंधने घालण्यात आली. पण भारतकथेतील बव्हंशी  मुख्य पात्रे ही तथाकथित वर्णसंकरीत आहेत. वर्णसंकरितांना वैदिक समाजनियमांनुसार राज्य करताच येत नाही. मुळात केवळ त्याच आधारावर ते वैदिकही ठरू शकत नाहीत.

३. भिमाने हिडिंबेशी केलेला एक वर्षीय करार विवाह हा वैदिक विवाहप्रकारांत कोठेही बसत नाही.

४. वसिष्ठ, विश्वामित्र वगैरे ऋषी ऋग्वेदरचनेत सामाविष्ट होते. ही रचना मुळात अफगाणिस्तानात झाली. त्यामुळे कुरु-पांचाल प्रदेशात घडणा-या कथेत ते कसे असू शकतात? प्रदिर्घ आयुष्याच्या भाकडकथा दुर ठेवल्या तर ही घालघुसड लक्षात येते.

५.  वैदिक साहित्यातील राज्यव्यवस्था, ग्रामव्यवस्था कोठेही महाभारतातील चित्रणाशी यत्किंचितही जुळत नाही. वैदिक भारतात आल्यावर महाभारत घडले असते तर धार्मिक साहित्यातही त्याचे प्रतिबिंब उमटले असते, पण तसे वास्तव नाही.

६. महाभारतातील नगरे हे सिंधूकालीन नगररचनांशी साधर्म्य दर्शवतात. शिवाय ती असुरांनी निर्माण केली ता मुळ सत्याचे अवशेष नंतरच्या भाकडकथा घुसवणा-यांना पुसता आलेली नाहीत. वैदिक साहित्य हे नगररचनाशास्त्राशी दुरान्वयानेही संबंध दर्शवत नाही. किंबहुना त्यांचे अज्ञानच त्यातून प्रतीत होते.

७. "पुरू" या नांवाची वैदिकांची एक टोळी होती. पुरु नांव अवेस्त्यातही विपूल प्रमाणात आढळते. ऋग्वेदातील पुरु हे टोळीनाम आहे, व्यक्तीनाम नाही. इसवीसनपुर्वी तिस-या शतकातही गांधारी प्राकृत जीवंत होती याचे लिखित पुरावे अस्तित्वात आहेत. तिच्याच निकटची दारी (अवेस्त्याची पर्शियन भाषेची एक बोली) भाषा त्याच वेळीस अस्तित्वात होती. हे भाषिक जाळे आजही जीवंत आहे. त्यामुळे समान शब्द आले म्हणून वैदिकांना कशाचेही श्रेय देणे गैर आहे. संस्कृत भाषा मुळात दुस-या शतकापर्यंत अस्तित्वात आलीच नव्हती हेही येथे लक्षात घ्यावे लागते. पुरु हा शब्द प्राचीन काळी वेगवेगळ्या अर्थाने विविध संस्कृत्यांत वापरला जात होता हे  स्पष्टपणे दिसते. नामसाधर्म्यावरून अथवा त्यातून अनुकूल अर्थ काढत झरथुस्ट्राचा जन्म हस्तिनापूरला झाला, गया येथे त्याला ज्ञान प्राप्त झाले असा अर्थ काढणारे आजही कमी नाहीत! तसाच उद्योग महाभारताबाबत केला तर मग अ.ज. करंदीकरांच्या म्हणण्याप्रमाणे महाभारतकथा मुळात पश्चिम आशियात घडली हेही मान्य करावे लागेल. पण ते वास्तव नाही.

"पुरु" हा शब्द ऋग्वेदात टोळीचे नांव म्हणून येतो. अवेस्त्यात हाच शब्द "पौरु...पुरु" असा येतो व त्याचा अर्थ पुरातन असा आहे तसाच मनुष्यनिदर्शकही आहे. याच शब्दाची अनेक रुपे असून नागरिक, नगर असेही शब्द पुरू हा मुळ घेऊन बनवण्यात आलेले आहेत. उदा. पूर, पौर इ.  "पुरु" हा शब्द असिरियन इष्टिका लेखातही येतो व तेथे या शब्दाचा अर्थ "जननिर्णय" असा आहे. अक्काडियन ही सेमेटिक गटाची भाषा आहे, इंडो-युरोपियन नव्हे. त्यामुळे महाभारतातील पुरु हा ऋग्वेदातीलच पुरू असे मानायचे काही कारण नाही. भारतीय पुरु ऋग्वैदिक पुरु टोळीशी संबंधित असल्याचे अंदाज चुकीचे आहेत. ( संदर्भासाठी पहा- "The Construction of the Assyrian Empire: A Historical Study of the Inscriptions of Shalmanesar III (859-824 B.C.) Relating to His Campaigns to the West by Shigeo Yamada, Pub.  Brill, page- 323-24)


८. विवाहप्रकारांत पाहिले तर असूर विवाह हा प्रकार आहे व तो नेमका क्षत्रियांस लागू आहे असे स्मृती सांगतात. कृष्णाने केलेला  विवाह त्याच प्रकारचा होता. पण कृष्ण कथेनुसारच मुळात क्षत्रिय नाही. तो स्वत: असूर कुळातला आहे, त्याची आईही असूर कुळातील आहे. असूर वैदिक असू शकत नाहीत. म्हणजेच तथाकथित क्षत्रियही असू शकत नाहित. किंबहुना असते व वैदिक धर्म तेंव्हा भारतात असता तर यावर मोठा धार्मिक गहजब माजवला गेला असता. व साहित्यात तिचे पडसाद उमटले असते. पण तसे चित्र नाही. उलट उत्तरकालीन प्रचारकांनी केलेली ती सारवासारव आहे.

येथे मी अत्यंत अल्प उदाहरणे दिली आहेत. महाभारतातील समाज व्यवस्था वैदिक समाजव्यवस्थेशी दुरान्वयानेही जुळत नाही. प्राचीन असुरांच्याच कथांना एनकेन प्रकारेन वैदिक प्रचारासाठी वापरण्यासाठी त्यावर वैदिक कलमे करण्यात आली आहेत.  आणि ती स्पष्टपणे पाहता येतात. फक्त त्यासाठी वैदिक चष्मा बाजुला सारला पाहिजे! भारतकथा वैदिक धर्म भारतात येण्याच्या बराच काळ आधी घडून गेली आहे. महाभारतातील वैदिक कलमे बाजुला केली की वास्तव दिसू लागते. 

No comments: