Sunday, April 2, 2017

अनुवादकांनी मुद्दाम गोंधळ वाढवला

संस्कृत किंवा अन्य परभाषा येत नाही म्हणून असंख्य अभ्यासक अनुवादांचा आधार घेत असतात. वेद, ब्राह्मण ग्रंथ, स्मृत्यांसाठी अनुवादांचा विशेषकरून वापर होतो. रामायण महाभारत व पुराणेही त्याला अपवाद नाहीत. मी मराठी अनुवादांचा कधी वापर केला नाही. पण अलीकडे काही हिंदी व मराठी अनुवाद पाहिले तेंव्हा लक्षात आले कि बापटशास्त्री, चित्रावांसारख्या महाविद्वानंचेही वेद व मनुस्मृतीचे अनुवाद प्रामाणिक नाहीत. अनुवाद करतांना त्यांनी अनेक ठिकाणे सोयिस्कर अर्थ काढलेले तर आहेतच पण मुळ श्लोकात आजीबात नसलेले शब्द अनुवादात घुसवलेले आहेत. ते त्यांनी अजाणतेपणे केले असो वा जाणीवपुर्वक, मूळ श्लोकाचा शब्दश: अनुवाद देत मग आपले आकलन दिले तरी चालेल. प्रत्येकाचे आकलन वेगळे असू शकेल. पण अनुवादातच असे का? यामुळे संस्कृत येत नसलेल्या विद्वानांचे गैरसमज होत त्यांचेही आकलन व विश्लेशन चुकणार नाही काय?

मग संस्कृत शिका...असा एक प्रतिवाद येतो. अभ्यासकांना मग जगभरच्या सर्वच प्राचीन भाषा शिकाव्या लागतील! पर्शिय, अरेबिक, हिट्टाइट वगैरे. त्यातही प्रत्येक भाषा कालौघात बदललेली आहे. ऋग्वेदाचे संस्कृत समजून घ्यायला यास्का-सायनासारख्यांची मदत प्रकांड संस्कृत तज्ञांनाही घ्यावी तर लागतेच पण जुन्या पर्शियनमधील गाथा (अवेस्ता) ची भाषाही समजून घ्यावी लागते. शिवाय यास्कही प्रामाणिक नाही. अनेक शब्दांचे धातू तो ओढून ताणून काढतो. मग काय करणार? अनुवादांवर भिस्त ठेवावीच लागते. तेच अप्रामाणिक असतील तर सांस्कृतिक इतिहास व त्याचा अभ्यास दिशांध होऊ शकतो. पण आपले लोक मुळातच लबाड आहेत तर त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा काय करणार?

इंग्रजीतील अनुवाद मात्र त्यातल्या त्यात प्रामाणिक आहेत हे मात्र आवर्जून सांगतो. हिंदुंनी इंग्रजांप्रति कृतज्ञ केवळ त्यासाठीच रहायला हवे, नाहीतर या वैदिकांनी हिंदुंचा साराच इतिहास गिळून टाकला असता!

-संजय सोनवणी

No comments: