Sunday, April 2, 2017

हिंदू धर्माचे मुख्य स्त्रोत!

तंत्रांचा निर्माता शिव मानला जात असून बहुतेक तांत्रिक ग्रंथ शिव-पार्वती संवादातून साधले गेलेले आहेत. तंत्रशास्त्रांत आगम, यामल व तंत्र यांचा समावेश होतो. सृष्टीतील यात्वात्मकता मानवी जीवनाचा आधार बनवत ते सुखी व संपन्न करणे हा तंत्रांचा मुख्य उद्देश आहे. योगाच्या द्वारे शिव-शक्तीशी तादात्म्य साधणे आणि मानवी जीवात्म्याला पशुभावातून बाहेर काढणे हा उच्च आध्यात्मिक दृष्टीकोन तंत्रांचा आहे. तंत्रांतुनच सांख्य तत्वज्ञानाचा उदय झाला. तंत्रे वेदप्रामाण्य मानत नसून तंत्रे ही स्वत:तच प्रमाण आहेत, प्रत्यक्ष ज्ञान आहेत असे मानले जाते. तंत्रांत अनेक संप्रदायही असून पांचरात्र संप्रदाय महाभारत काळात अत्यंत लोकप्रिय होता असेही दिसते. हा पंथ कृष्णाच्या घराण्यात, म्हणजे सात्वतांत अत्यंत लोकप्रिय होता. पाशुपत मत सिंधू काळातही अस्तित्वात असावे असे शिवाच्या ज्या पशुपती स्वरुपातील मुद्रा मिळाल्या आहेत त्यावरुन दिसते.
तंत्रे ही अवैदिक होती व आहेत. मध्ययुगातील धार्मिक साहित्यातुनही हे मत ठळकपणे सामोरे येते. तंत्रशास्त्रांचे वैशिष्ट्य म्हणज्वे त्यात भेदाभेद नाही. स्त्री-पुरुषातील समानता हा तंत्रांचा गाभा आहे. बुद्धपुर्व काळ ते बाराव्या-तेराव्या शतकापर्यंत आगमशास्त्रांनी वैदिकांना पुरेपुर झाकोळून टाकले होते. इतके कि अनेक वैदिकही वेद सोडून तंत्रांच्या भजनी लागले. अशा मंडलींना वैदिकांनीही बहिष्कृत करुन टाकले.
तंत्र हे शिव-शक्तीशी निगडित असून ती वेदांपेक्षा पुरातन आहे. वैदिक साहित्यापेक्षाही तंत्रसाहित्याची विशालता अनेक पटीने अधिक आहे.ती अपौरुषेय अथवा अपरिवर्तनीय नसल्याने त्यांत भरही पडत राहिली. (तशी वेदांतही अपौरुषेय म्हणतात पण वेळोवेळी भर पडलेलीच आहे.) त्यामुळे तंत्रांचा विस्तारही अफाट झाला. अगदी मंदिर स्थापत्यापासुन ते पार पंचमकार साधनांपर्यंत तंत्रांचा विस्तार आहे. योग ही तंत्रांची देणगी आहे. मध्ययुगात तंत्रांतील केवळ वामाचाराला लक्ष करत बदनाम केले गेले. पण स्वत: शिवाजी महाराज, संभाजी महाराज शाक्त होते हे वास्तव मात्र विसरले जाते. संभाजी महाराजांना बदनाम करण्यासाठी त्यांच्या शाक्त असण्याचा उपयोग केला गेला. पण तंत्र अथवा शाक्त म्हणजे फक्त वामाचार नाही, तर वामाचार ही एक उपशाखा आहे. " धर्म, कर्मकांड, विधि-विधाने, कायदा, औषधी, यातू, शेतीशास्त्र, धातू, शरीरविज्ञानशास्त्र इत्यादि धार्मिक व व्यावहारिक बाबींचा समावेश तंत्रांत होतो. शिवशक्तीशी तादात्म्य साधने हा मुख्य उद्देश्य, व्यावहारिक गोष्टींना अधिक महत्व असलेला, तंत्र हा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन आहे. तंत्रांचा दृष्टीकोन हा श्रौत-स्मार्त धर्माच्या विरोधात आहे. थोडक्यात वैदिक धर्म व हिंदू धर्म यांच्यात काहीएक संबंध नाही.

No comments: