Tuesday, April 25, 2017

लग्नाआधी घटस्फोट? हिंदुंनो सावध!!


Image result for hindu marriage actपरवा मी एका लग्नाला गेलो होतो. पुरोहित जे मंत्र "वैदिक पद्धतीचा विवाह" म्हणून म्हणत होता ते ऐकून तर मी बेशुद्ध पडायचा बाकी राहिलो. सप्तपदीच्या वेळीस पुरोहित नव-या मुलाला मुलीला उद्देशून म्हणायला सांगतो..."इदं न मम" म्हणजे लग्नाआधीच "तू माझी नाहीस". म्हणजे चक्क घटस्फोटच की! नशीब तेथेच पत्नीला स्वाहा करायला लावले नाही. बाकी मंत्रांतील एकही मंत्र वैदिक नव्हता व मुख्य म्हणजे लग्नाशीही संबंधीत नव्हता. संस्कृतात असल्याने हिंदुंना काय म्हटले जाते हे समजत नाही. उलट लै खूष असतात लोक...कि काय भारी लग्न लावलं म्हणून! पण मुळात हा लग्नविधीच नाही हे कोणाला समजायचे? 

कोणी लग्नाला श्राद्धाचेही मंत्र म्हणत असतील. कसे समजणार? रजिस्टर लग्न करा ना त्यापेक्षा किंवा गांवक-यांनी मंगलाष्टके म्हटली तरी पुरेशी आहेत. शेवटी लग्न म्हणजे आहे तरी काय? श्रद्धायुक्त मनाने सहचरासोबत कोणत्याही स्थितीत जीवनभर एकत्र सुखाने राहण्याची केलेली समाजासमोरची प्रतिज्ञा म्हणजे लग्न. हे "देवाब्राह्मणांच्या साक्षीने" लग्न म्हणजे थोतांड आहे हे कधी समजणार?

हिंदुंना वेदांचा कसलाही अधिकार नसला तरी त्याचे खुळ आहे व आजकाल ते किमान विवाहात तरी वाढलेले आहे. ते का वाढवले जाते आहे हे समजायला फारशा बुद्धीची गरज नाही. "वैदिक पद्धतीने विवाह संपन्न होईल" असे चक्क अनेक लग्नपत्रिकांवर छापलेले असते. म्हणजे लग्न लावायची वैदिक पद्धती वेगळी आणि हिंदू पद्धती वेगळी हा फरक माहितच असतो. 

पण वैदिक पद्धतीने हिंदुने लग्न लावणे म्हणजे मुस्लिम पद्धतीने ख्रिस्त्याने लग्न लावणे. हा धर्म-समभाव ठीक वाटला तरी मुळात मंत्र तरी लग्नाचेच म्हणावेत की नाही? पुरोहितांना मी दोष देत नाही कारण त्या बिचा-यांना तरी कोठे काय माहित असते? त्याला एक मंत्राचा अर्थ विचारा...मग पहा कशी फे फे होते. कोठलेतरी कशासाठीही असलेले पण संस्कृतातले मंत्र असले कि पुरोहिताला पुरेसे असते! पण लग्न करणा-यांना अक्कल नको का?

लग्नाची वैदिक पद्धती खरोखर वेगळी असते. वैदिकांची लग्ने त्याच पद्धतीने होतात. हिंदुंसाठी कधीही वैदिक पद्धती वापरली जात नाही हे समजत नसेल तर आपल्या अज्ञानाबद्दल आपलेच डोके झोडून घ्या!

-संजय सोनवणी

2 comments:

Anonymous said...

इदं न मम" म्हणजे लग्नाआधीच "तू माझी नाहीस".
संजयजी, लग्ना अधि समाजाला मान्य असलेले एका पर स्त्री सोबतचे शरीर संबंध चुकीचे ठरवतात. ते लग्ना नंतर मान्य असतात.मग तुम्ही म्हणता तसं घटस्फोटाचा संबंध येतो कोठे?

Sanjay Sonawani said...

मित्रा, हे लग्नविधीसाठीचे आणि त्यातील मंत्रवाक्य आहे काय? ते नाही. "ही माझी नाही" असे सप्तपदी घेतांना जेथे सोबत रहायच्या सात प्रतिज्ञा घेतात तेथे इदं न मम या गोळवलगुरुजींच्या लोकप्रिय वाक्याचे काय काम? पुरोहिताने हे जाणून बुजुन केले असेल असे नाही, त्यालाही आपण काय म्हनतोय हे माहित नसेल. पण असे करने हा अपराध आहे हे नक्की.