Tuesday, April 4, 2017

तंत्रांकडे चला...इहवादाची कास धरा!

तंत्रे हीच आपल्या यशातील/फैलावातील अडथळा आहेत हे माहित असल्याने वैदिकांनी तंत्रांना बदनाम करण्याचे धोरण जाणीवपुर्वक ठेवले. असे असुनही हिंदू सामान्यपणे तंत्राधारितच जीवन जगतो, वेदाधारित नाही हे वास्तव ते सांगत नाहीत. तंत्र म्हणजे सुफलन. तंत्र म्हणजे शेती. तंत्र म्हणजे समतेचे विश्व. सांख्य तत्वज्ञान तांत्रिकांनी निर्माण केले ज्यात पुरूष व प्रकृती हीच आधारभूत मुलतत्वे असतात. तंत्रशास्त्रे वर्णव्यवस्था व वेद मानत नाही. बव्हंशी उपनिषदे ही सांख्य तत्वज्ञानावर आधारित आहेत, वैदिक नव्हेत. मुर्तीशास्त्र व मंदिररचना ही सर्वस्वी तंत्रांवर आधारित आहे. गाभारा म्हणजेच गर्भगृह. शिखर हे लिंगाचे प्रतीक असते. योनी व लिंग ही सर्जनाचे प्रतीके म्हणून आल्याने त्यांकडे कोणीही अश्लील विचारांनी पाहिले नाही. शक्तीदेवतांसोबतच वनस्पती, पशू याचे चित्रण करतांना प्राचीन कलाकारांनी आपले कौशल्य पणाला लावले. वैदिक कला भारतात जवळपास शून्य आहे असे म्हटले तरी चालेल. ऐश्वर्य देणा-या यक्ष-यक्षीणींची संस्कृतीही तांत्रिकांनीच घडवली. नागपंचमीपासुनचे सारे सण हे तंत्राधारित आहेत. यक्षपुजन, शिव-देवी माहात्म्य गायन करणारे आहेत. दसरा हा विश्वजननाचा उत्सव. वैदिकांचा तसा एकही सण हिंदू साजरा करत नाहीत. इहवाद हा तंत्रांचा पाया. वाममार्गी तांत्रिकांनी अतिरेकीपणा केला हेही वास्तव आहे. पण त्यांना आधाराला घेत तंत्रांनाच बदनाम करण्याचा प्रयत्न आजही काही करत असतात. शिवाजी महाराज शाक्त होते. संभाजीमहाराज शाक्त होते. शिवाजीमहाराजांन बदनाम करण्याची हिंमत झाली नसली तरी संभाजी महाराजांना कसे बदनाम केले गेले हा इतिहास ताजा आहे. शाक्त म्हणजे वामाचारीच असा समज करुन देणारे वैदिक त्याला जबाबदार आहेत. एकतर चांगले ते आपल्याच नांवावर खपवा आणि खटकते अथवा अडचणीचे ठरते, ते पुरते बदनाम करुन टाका हा उद्योग तंत्रांबाबतही झाला आहे. तंत्रशास्त्रे देहात्मवाद मानतात..म्हणजे देहापेक्षा आत्मा वेगळा आहे हे मत त्यांना मान्य नाही. आत्मवाद वैदिकांनी आणला. पण बुद्धाच्या आणि लोकायतिक तत्वज्ञानात देहात्मवाद कायम राहिला. पंचमकार हा तंत्रांतील योग साधनेप्रमाणे एक उपप्रकार आहे. योग कधीही वैदिक नव्हता. पंचमकार साधनेला बदनाम केले गेले असले तरी हे लक्षात ठेवायला हवे कि पंचमकार साधना वेगवेगळ्या रुपात अगदी वैदिकांतही पुरातन काळी अस्तित्वात होतीच! जिज्ञासुंनी त्यासाठी राजवाडेंचे विवाहसंस्थेचा इतिहास वाचावे. मग केवळ तंत्रांना बदनाम करण्यासाठी तंत्रांतील एक गौण प्रकार त्या पंचमकार साधनेला हिडीस स्वरुपात बदनाम करत तंत्रेच बदनाम करायची आणि तंत्रांनीच विकसीत केलेल्या उदात्त तत्वज्ञानावर मात्र डल्ला मारायचा प्रयत्न करत त्यातील आत्मा...म्हणजे इहवाद...हा मारुन टाकायचा प्रयत्ब्न करायचा यात वैदिकांचेही नुकसान तर झालेच पण अनंत पटींनी हिंदुंचे झाले. इहवादी लोक परलोकवादी बनले आणि हीण-दीन झाले हा इतिहास काही चांगला नाही. हिंदुंनी आपल्या तत्वपरंपरांना पुन्हा नीट नव्याने अभ्यासायला हवे. त्यातच त्यांची प्रगती आहे.

-Sanjay Sonawani

No comments: