Wednesday, April 5, 2017

विष्णू व शिव : परस्परविरोधी धर्मांची प्रतीके

विष्णु आणि शिव: यज्ञप्रधान आणि यज्ञविरोधी अशा दोन संस्कृतीप्रवाहांची भिन्न प्रतिक दैवते
सध्याच्या हिंदू म्हटल्या जाणार्या धर्मात विष्णु आणि शिव या दोन प्रमुख देवतांना अनन्यसाधारण महत्व आहे . या धर्मात वैष्णव आणि शैव असे दोन संप्रदाय अनुक्रमे विष्णु आणि शिव यांना आपले प्रधान देव मानतात. पण पुरातन काळापासुनचे वैदिक आणि वैदिकेतर यांचे सांस्कृतिक संघर्षांचे रुप पाहिले असता शैव आणि वैष्णव यांपैकी कोणत्या संप्रदायाची मुळे भारतीय जनमानसात रुजली आहेत, याचा शोध घेणे आवश्यक आहे. हे जाणुन घेण्यासाठी प्रथम शिव आणि विष्णु या देवतांचे मुळ, त्यांचे प्राचीन काळापासुनचे विविध जनसमुहांबरोबरचे नाते व त्यांची आत्ताच्या आधुनिक काळापर्यंत सर्वोच्च देवता म्हणुन टप्याटप्याने झालेला सांस्कृतिक विकास याविषयी माहिती घेणे आवश्यक आहे. सर्व प्रथम शिव या देवतेविषयी आढावा घेऊया.

शिव या देवतेचे मुळ भारतीय उपखंडात वैदिक धर्माच्या आगमनाआधीपासुनचे आहे. याचे भौतिक पुरातत्वीय पुरावे हडप्पा आणि मोहेंजोदारो येथील उत्खननात सापडलेले आहेत. तेथे काही नाण्यांवर शिव देवतेस्वरुप मानवसदृश प्रतिमा आहे. एका खडकावर अर्धनग्न अवस्थेतील पद्मासनात बसलेली एक प्रतिमा आहे जिची तुलना विद्वानांनी आणि इतिहासकारांनी महाभारतात उल्लेख असलेल्या त्रिमूर्ति पशुपतीनाथाशी केली आहे. याशिवाय उत्खननात शिवपिंडस्वरुप पाषाणही सापडले आहेत जे काहीशे आजच्या आधुनिक मंदिरातल्या शिवलिंगाप्रमाणे वाटतात. हे सर्व पुरावे असे सुचित करतात की शिव या देवतेची लोकप्रियता पुरातन हडप्पा आणि मोहंजोदारो या सिंधु संस्कृतीतील नगरांतल्या लोकांमध्ये होती. याचा अर्थ शैव लोकसंस्कृती अतिशय पुरातन काळापासुन भारतीय जनमानसात घट्ट रुजलेली होती.

शिवाचा लिखित साधनांत असलेला उल्लेख सर्वप्रथम ऋग्वेदात आढळतो. पण ते अतिशय तुटक-तुरळक असे आहे. ऋग्वेदात "शिव" या नावाने एका जनसमुहाचा उल्लेख येतो, हा जनसमुह दाशरज्ञ युद्धामध्ये सुदास् राजाच्या विरोधात लढला होता. शिव हा शब्द संपूर्ण ऋग्वेदात फक्त एका जनसमुहाचे नाव म्हणुन येतो. बाकी शिवाचे एका देवतेच्या स्वरुपातील तुरळक उल्लेख म्हणजे त्याचा "शिश्नदेव" म्हणुन केलेला उल्लेख! याचा अर्थ लिंगपुजकांचे दैवत असा होतो, जेव्हा वैदिक लोकांचे सिंधु नदीच्या खोर्यात किंवा त्याच्या आसपासच्या प्रदेशात आगमन झाले तेव्हा रचलेल्या प्राथमिक स्वरुपातल्या ऋग्वैदिक ॠचांमध्ये शत्रु असलेल्या वैदिकेतर लोकांच्या धर्मभावनांचा अपमान करण्यात आला आहे. या सर्व मुदद्यांवरुन असे दिसुन येते की वैदिक लोक आणि वैदिक धर्म शिव या देवतेला वैदिकेतर, अनार्यांचे दैवत मानत होते आणि तेच ऐतिहासिक वास्तव होते. दुसरी बाब ही सुद्धा आहे की ऋग्वेदात दुसर्या बाजुला "रुद्र" यादेवतेचे असंख्य उल्लेख आढळतात. आत्ताचे हिंदू शिव आणि रुद्र या दोन देवतांना एकच मानतात. पण मुळात ऋग्वेदात ज्या रुद्राचा उल्लेख सापडतो तो इंद्र, मित्र, वरुण आणि अग्नि यांसारख्या आणखी शेकडो वैदिक देवतांप्रमाणे आकाशस्थ देव आहे. याचा स्वभाव अतिशय उग्र स्वरुपाचा आहे. पण मुळात सिंधु संस्कृतीच्या लोकांसाठी आणि नंतर रचलेल्या शैव-शाक्त धर्म प्रधान असलेल्या तंत्रशास्त्रांसाठीसुद्धा शिव ही देवता शांत स्वरुपाची आहे आणि तिचा वैदिक रुद्राशी काहीच संबंध नाही. वैदिक रुद्राचे जे ऋग्वेदात वर्णन आढळते ते खरे तर पौराणिक शिवाशीसुद्धा जुळत नाही. वैदिकांच्या यज्ञामध्ये रुद्र या देवतेला आहुती दिली जात होती पण शिवाला यज्ञामध्ये कधीही आहुती दिली जात नव्हती म्हणुनच उत्तरकालीन पुराणांमध्ये शिवाचा उल्लेख यज्ञाचा विध्वंसक वा स्मरारी असा केला गेला आहे. या पुराणांत असे वर्णन आढळते की वैदिकांच्या यज्ञसंस्कृतीचा कडवा समर्थक प्रतिनिधि असलेला प्रजापती दक्ष हा आपल्या महायज्ञामध्ये शिव सोडुन इतर सर्व देवांना आमंत्रण देतो कारण हा प्रजापती शिवद्वेष्टा होता, याचा अर्थ यज्ञाचा विरोध करणार्या यज्ञबाह्य संस्कृतीच्या लोकांना म्हणजेच शुद्रांना वैदिक लोक त्या काळात यज्ञात सहभागी होऊ देत नसत. ही पुर्वग्रहदुषित भावनाच पुराणकारांनी व्यक्त केली आहे तीही यज्ञविरोधकांचा एक मुख्य प्रतिनिधि म्हणुन शिवाचा उल्लेख करुन! याच पुराणांनी वैदिक रुद्राचे महत्व कमी करुन ते फक्त शिवासाठी एक ठेऊन त्याला त्रिमुर्तीत संहारक देव म्हणुन स्थान दिले पण त्यात शिवापेक्षा वैदिक विष्णुचे स्थान उच्च कसे राहील याबाबत पुरेपुर काळजी घेतलेली दिसते. याची प्रचिती पुराणांचे ओझरते दर्शन घेतल्यानेही होते. लक्षात घेण्यासारखे इतकेच की अगदी वेदपुर्व काळापासुन ते सध्याच्या आधुनिक काळापर्यंत शिवाचे स्थान भारतीय सांस्कृतिक आणि लोकपरंपरांमध्ये अढळ राहिले आहे. जर प्राचीन काळापासुन भारतात नांदत असलेल्या विविध लोकसमुहांच्या चालिरीती आणि परंपरांचा अभ्यास केला तर हा वरिल निष्कर्ष नक्की मिळेल. याचा सारांश असा की शिव या देवतेला, देवता म्हणन्यापेक्षाही अधिक तत्वाला प्रधान मानणार्या यज्ञविरोधी परंपरेला मानणारा एक मोठा जनसमूह हा प्राचीन काळापासुन या देशात राहतो. या परंपरेतुन उपनिषदे, सांख्य-चार्वाक आणि योग यांसारखी दर्शने, अशा लिखित विचारप्रवाहांचा उगम झाला होता. यांनीच प्रथम वेदांवर आणि वैदिक कर्मकांडावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या टिका केली होती.

पुरातन काळापासुन भारतीय संस्कृतीविश्वात आपले अढळ स्थान असणार्या शिवाला त्याच्याच संस्कृतीला विरोध करण्यासाठी विष्णु या निम्न दर्जाच्या वैदिक देवतेचे पुराणकारांनी नंतरच्या काळात माहात्म्य का वाढवले, याचा आढावा सुद्धा घेतला पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम विष्णु या देवतेचे मुळ, त्याचा इतिहास आणि नंतर त्याला सर्वोच्च देवता बनवल्याची लिखित प्रक्रिया याबाबत विवेचन करणे आवश्यक आहे.

विष्णु या देवतेचे पुरातत्वीय अस्तित्व कोणत्याही प्राचीन संस्कृतींमध्ये आढळत नाही. त्याच्या सदृश्य काही दैवतेही उत्खननात सापडली नाहीत. साहजिकच सिंधु संस्कृतीच्या हडप्पा आणि मोहेंजोदारोच्या उत्खननातसुद्धा विष्णुसदृश देवता नाही. विष्णु या शब्दाची व्युत्पत्तीही मुळच्या कोणत्या भाषेतील आहे, हे अज्ञात आहे . पण प्रथम विष्णु या शब्दाची व्युत्पत्ती सर्वप्रथम यास्काचार्यांच्या निरुक्त या वेदांगात आली आहे. निरुक्तात म्हटले आहे की "विर्ष्णु विश्वातर वा व्यासनोतर वा" याचा अर्थ असा की "विष्णु असा जो तो सर्वत्र प्रवेश करतो(पसरतो)". पुढे निरुक्तात असेही म्हटले आहे- "यद् विसितो तद् विर्ष्णुं भवति" याचा अर्थ "जो सर्व बंधनातुन मुक्त होऊन प्रसारित होतो तो विष्णु होय" ऋग्वेदाला आणि विशेषकरुन नंतरच्या ब्राह्मण ग्रंथांना विष्णुबाबत जे अभिप्रेत आहे तेच हे वरिल यास्काचार्यांच्या व्युत्पत्तीवरुन लक्षात येते. ऋग्वेदात विष्णुचा उल्लेख येतो तो उपेन्द्र म्हणुन! उपेन्द्र म्हणजे इंद्राचा दुय्यम सहकारी. हा विष्णु आपल्या तीन पावलांनी संपूर्ण विश्वात विस्तारतो. त्याची तीन पावले म्हणजे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. बहुतेक विद्वान याचा संबंध निसर्गघटनेशी जोडतात याचा अर्थ प्रारंभीच्या काळात वैदिक लोकांसाठी विष्णु ही दुय्यम देवता होती पण नंतरच्या काळात ब्राह्मण ग्रंथांनी ऋग्वेदातली मुळची विष्णुबाबतची निसर्गाच्या संबंधीतील घटना यज्ञाच्या कर्मकांडाशी जोडली. त्याचे विश्षेषण असे की यज्ञमय विष्णुच्या मदतीने देवांनी असुरांकडुन भुमी हिरावुन घेतली, ब्राह्मण ग्रंथांना अभिप्रेत असलेला विष्णु म्हणजे यज्ञ आणि यज्ञीय कर्मकांड. ब्राह्मण ग्रंथांच्या काळात विष्णु हे यज्ञाचे एक प्रतिक बनले होते. तो काळ वैदिक लोकांचे भारतात आगमन झाल्यानंतरचा त्यावेळी तसा वैदिकेतर लोकांमध्ये शैव-शाक्त तसेच जैन विचारांचा गाढा प्रभाव होता, त्यामध्ये आपल्या यज्ञीय कर्मकांडाचा प्रसार झाला पाहिजे, असे वैदिकांना वाटत होते. यज्ञाच्या प्रसारासाठी अधिकाधिक भुमी पदरात पाडुन घेणे आवश्यक आहे म्हणुन वैदिक लोक त्याकाळी राजांना, वैदिकेतर धर्मगुरुंना आणि श्रीमंत व्यापार्यांना भुलवण्याचा प्रयत्न करत असत. त्यांपैकी काहीजण त्याला भुलुन यज्ञाच्या कर्मकांडावर विश्वास ठेऊ लागले होते. याचा अर्थ असा होतो की वैदिक लोक वैदिकेतर समाजांमध्ये यज्ञीय कर्मकांडाचा प्रसार करण्यासाठी यज्ञमय विष्णुचा विस्तार करत होते, हीच घटना ब्राह्मण ग्रंथांमध्ये थोडक्यात उल्लेखिलेली आहे. एकदा का वैदिकेतर समाजातील काही घटक भ्रामक यज्ञाच्या कर्मकांडाला भुलुन वैदिक बनले की सहाजिकच त्यांना आपल्या मुळ समाजबांधवांकडुन विरोध होऊ लागला. हाच विरोध उपनिषदांमध्ये आणि अनेको दर्शनांमध्ये परावर्तित होऊ लागला. यज्ञाला आणि यज्ञीय कर्मकांडाला विरोध म्हणजेच यज्ञस्वरुप विष्णुला विरोध! असे समीकरण बनले. म्हणुन वैदिकांसाठी विष्णु हे वैदिक धर्माला म्हणजेच यज्ञधर्माला विरोध करणार्याविरुद्ध एक प्रभावी शस्त्र बनले. विष्णुबाबतचा हा दृष्टीकोन पुराणकारांना त्याला वैदिकांसाठीचे सर्वोच्च दैवत बनवण्यास कारणीभुत ठरला.

ब्राह्मणग्रंथांच्या काळात यज्ञाला विरोध करणार्या लोकांमध्ये शैव, जैन आणि काही इतर लोकधर्मांचे लोकसुद्धा होते. म्हणुनच पुराणकारांनी वैदिक आर्य धर्माचे विरोधक म्हणुन असुर-राक्षस यांचा मुद्दाम उल्लेख केलेला आहे . पुराणांमध्ये नीट डोकावले असता तसेच वैदिक धर्माने केलेल्या सांस्कृतिक उलथापालथी दुर केल्या असत्या असे दिसते की देवांशी, पर्यायाने विष्णुशी युद्ध करणारे असुर हे शिवाचे भक्त असतात. इंद्र वैगरे देव जेव्हा असुरांशी पराभुत होतात तेव्हा शेवटी विष्णु पृथ्वीवर विविध प्रभावी व्यक्तींच्या रुपात अवतार घेऊन असुरांचा नाश करतो आणि देवांना त्यांचे राज्य परत मिळवुन देतो. ब्राह्मण ग्रंथांच्या भाषेत म्हणायचे झाले तर जेव्हा समाजात वैदिक देवतांचे महत्व कमी होते, ते कमी होण्याची कारणे म्हणजे कोणीतरी वैदिकेतर समाजगट यज्ञातल्या भ्रामक प्रथा, यज्ञांत होणारा पशुंचा वध आणि मुख्यत्वे यज्ञातल्या यजमानाची होणारी लुट, त्याचा मानसिक आणि बौद्धिक पराभव याबाबत वाचा फोडतो तेव्हा त्यांच्या या क्रांतीला निष्प्रभ करण्यासाठी यज्ञस्वरुप विष्णुचा उपयोग करण्यात येतो. हा विष्णु यज्ञविरोधी प्रचार करणार्या शक्तींचा अंत करतो. वैदिकांनी अशाप्रकारे उत्तर काळात ऋग्वेदात सर्वोच्च देव असलेल्या इंद्राचे माहात्म्य काहीसे कमी करुन यज्ञीय कर्मकांडाचे प्रतिक देव असलेल्या विष्णुचे महत्व वाढवण्याचा प्रयत्न केला. एका ठिकाणी दर्शनशास्त्रांनी आणि उपनिषदांनी भारतीय सांस्कृतिक वातावरणात वेदविरोधी आणि यज्ञविरोधी विचारप्रवाह प्रबळ केला तर दुसरीकडे इसवीसन पुर्व ५०० ते ४०० च्या काळानंतर किमान उत्तर भारतात अनेको वैदिकेतर परंपरा काहीशा मागे पडुन मोठ्या प्रमाणावर बौद्ध धम्माचा प्रसार झाला. नंतरच्या काळात बौद्ध धम्माला अधिक राजाश्रय मिळाल्यामुळे वैदिक यज्ञसंस्कृतीला हादरा बसला. अशा परिस्थितीत वैदिकांसाठी अत्यंत पवित्र असलेल्या यज्ञकर्माचा प्रसार कुंठीत होऊ नये आणि यज्ञाचे माहात्म्य अबाधित राहावे म्हणुन वैदिकांनी पुराणे आणि स्मृत्या या लिखित साधनांच्या माध्यमातुन इतर वैदिकेतर लोकधर्मांमध्ये सांस्कृतिक भेसळ केली. या प्रक्रियेत त्यांनी वैदिकेतर जनमानसांत लोकप्रिय असलेल्या काही प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तींना आपल्या लिखित वैदिक परंपराचा खास दुवा बनवले. (विष्णुचा अवतार मानल्या गेलेल्या काही व्यक्तींचा तर काही काल्पनिक पात्रांचा स्वतंत्रपणे अभ्यास दुसर्या लेखाद्वारे करण्यात येइल.) यात त्यांनी यज्ञाचे महत्व कायम राखण्यासाठी ऐतिहासिकदृष्टा यज्ञस्वरुप मानलेल्या विष्णुला सर्वोच्च देवता बनवले. या सांस्कृतिक उलथापालथीच्या काळात गुप्त राजांनी राजाश्रय दिल्यामुळे वैदिक धर्माचे पर्यायाने नवविकसित वैष्णव धर्माने शिवाचे महत्व कुंठीत केले. विष्णुच्या अवतारांच्या कथा जाणुनबुजुन रचण्यात आल्या. विष्णु हे यज्ञप्रधान संस्कृतीसाठी एक प्रतीकात्मक दैवत बनले. अशाप्रकारे असा कुत्रिम धुर्त प्रचार करुन सुद्धा भारतीय समजात शिवाचे महत्व कमी झाले नाही. शिवाचे पुराणांत काही प्रमाणांत वैदिकीकरण झाले असले तरी नवलिखित तंत्रशास्त्रानी शिवाचे माहात्म्य अबाधित राखले. याच जोरावर मध्ययुगीन काळात नाथ आणि वीरशैव लिंगायत यांसारख्या वेदविरोधी संप्रदायांचा उगम झाला. या संप्रदायांनी मध्ययुगीन काळात भारतीय समाजांत समता आणि बंधुता यांना प्राधान्य दिले, वैदिक यज्ञांचे महत्व, विषमतावादी वैदिक वर्णव्यवस्था यांना नाकारले.

या वरिल सविस्तार विवेचनावरुन हे सिद्ध होते की आजच्या काळात पुजली जाणारी विष्णु आणि शिव ही दैवते एके काळी यज्ञप्रधान आणि यज्ञविरोधी अशा दोन परस्परविरोधी परंपरांची प्रतिके होती. आजच्या काळात समाजाने आपल्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्ही बाजुला सारुन वैदिकांच्या सांस्कृतिक उलथापालथीमुळे निर्माण झालेल्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक गोंधळाकडे डोळसपणे आणि चिकीत्सक दृष्टीने पाहिले पाहिजे.

-Yash Mahalim

No comments: