Monday, April 10, 2017

हिंदू संस्कृतीची राजरोस चोरी...


सिंधु-घग्गर संस्कृती ही वैदिक धर्मीय आर्यांचीच निर्मिती हे सिद्ध करण्यासाठी काय उपद्व्याप चालले आहेत हे पाहिले तर थक्क व्हायला होते. या मंडळीने सिंधू संस्कृतीची लिपी वाचल्याचे व ती वैदिक संस्कृती असल्याचे अनेक दावे केले. एन. एस. राजाराम व एन. झा यांनी असाच दावा करत एक ग्रंथही लिहिला. (The Deciphered Indus Script-1999) त्यात त्यांनी २००० मुद्रांचे वाचन केल्याचे दाखवत काही मुद्रांवर वैदिक राजा सुदास, यदु, पुरु, कुत्स, राम आदींचा तसेच षडागमांचाही उल्लेख आहे तर बहुसंख्य मुद्रांवर नद्यांचे तर काही ऐहिक सामान्य उल्लेख आहेत असाही हास्यास्पद दावा केला. 

याच ग्रंथात लेखकद्वयाने सिंधू संस्कृतीला घोडा माहित होता हे दाखवण्यासाठी एका बैलाचे चिन्ह असलेल्या मुद्रेच्या छायाचित्रावर संगणकीय छेडछाड (forgery) केली. ही बनावटगिरी करण्याचे कारण म्हणजे सिंधू संस्कृतीत घोडा असल्यचे त्यांना सिद्ध करायचे होते! तसा एकही पुरावा उत्खननात मिळालेला नव्हता. आणि वैदिक आर्यांचे संपुर्ण जीवन तर संपुर्ण घोड्यांभोवतीच फिरते! त्यामुळे सिंधू संस्कृती वैदिकांचीच निर्मिती हे सिद्ध करायचे तर कोठुन तरी त्यात घोडा घुसवणे आवश्यकच होते! त्याशिवाय ते सिंधु संस्कृती वैदिकांची निर्मीती हे कसे सिद्ध करणार?

मग त्यांना बनावटगिरी करणे भाग पडले. त्यांनी फोर्जरी केली व लिपी वाचल्याचे दावे केले. पण त्यांचे नशीब काही एवढे चांगले नव्हते!

हे दावे वृत्तपत्रांत व पुस्तक  प्रसिद्ध झाल्यावर जगभर खळबळ उडाली. कारण या शोधाने (?) सिंधू संस्कृतीचा इतिहास नव्याने लिहिणे भाग होते. जगातील एका प्राचीन संस्कृतीची लिपी वाचणे हे असामान्य कार्य होते यात शंका नाही. पण राजाराम आणि झा यांचे दुर्दैव. हार्वर्डचे इंडोलोजिस्ट मायकेल विट्झेल आणि त्यांचे सहयोगी स्टीव्ह फार्मर यांनी झा व राजाराम यांची बदमाशी फ्रंटलाईनमद्ध्ये (आक्टोबर २०००) लेख लिहून उजेडात आणली. राजाराम व झा यांनी मुळच्या तुटलेल्या अर्धवट एकशिंगी प्राण्याच्या (Unicorn) मुद्रेला संगणकीय आधार घेत पुर्ण करत त्यांनी बैलाचा चक्क घोडा केला आहे हे त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले. यामुळे भारतीय विद्वत्तेची जगभर लाज निघाली. टीकेचा भडिमार झाला. 

प्रश्न हा कि सिंधू संस्कृतीचे निर्माते हे वैदिक आर्य हेच होते हे सिद्ध करण्याची निकड वैदिकंना एवढ्याचसाठी भासते कि हिंदुंना कसलाच इतिहास नव्हता हे त्यांना वारंवार सिद्ध करायचे असते. आधुनिक काळात एवढी बनावटगिरी, चक्क फोर्जरी केली जाते तर जुन्या काळात यांनी इतिहासात काय काय घोळ घालून ठेवले असतील याचा तुम्हीच विचार करा. हिंदुंचे सांस्कृतिक संचित लुबाडत वैदिक सांस्कृतिक स्ववर्चस्वतावाद निर्माण करणे हाच एकमेव उद्देश त्यामागे आहे हेच त्यातून दिसत नाही काय?

हिंदुंनी आपल्या संचिताबाबत, संस्कृतीबाबत निरंतर सावध राहणे त्यामुळेच गरजेचे बनून जाते! सारे काही वैदिकांचे हा भ्रम निर्माण करण्याचा ते कसोशीने प्रयत्न करत आले आहेत. आता वैदिकांचे वैदिकांना आणि हिंदुंचे हिंदुंनाच ठेवण्याची वेळ आली आहे. त्याखेरीज हिंदुंचा आत्माभिमान जागा होणार नाही. दुस-यांच्या ओंजळीने पाणी पिणे सोडून द्या! सांस्कृतिक चोरांना त्यांची जागा दाखवा!


(विट्झेल-फार्मर यांचा लेख या लिंकवर उपलब्ध आहे.

http://www.frontline.in/static/html/fl1720/17200040.htm )

-संजय सोनवणीNo comments: