Sunday, April 2, 2017

हिंदू व वैदिक हे दोन वेगळे धर्म!

धर्मग्रंथांकडे पाहिले तर त्यात येणारी नांवे ही वैदिक (अथवा सनातन धर्म) व पौराणिक वा आगमिक धर्म अशी नांवे येतात. म्हणजे दोन्ही एकाच धर्माचे आहेत असे धर्मशास्त्रांनाच मान्य नाही. दोन्ही धर्माचे धर्मविधी कसे वेगळे करायचे याचे निर्देशच धर्मशास्त्रांत आहेत. आगमिक तंत्रोक्त शिवप्रधान धर्म हा सिंधूकाळापासून चालत आला आहे असा सर्वच विद्वानांचा निर्वाळा असला तरी दुर्दैवाने तंत्रशास्त्रावर लिहिलेल्या अगणित ग्रंथांचा आजवर संगतवार अभ्यासच झालेला नाही. तंत्रशास्त्रावर लिहिले गेलेले हजारो ग्रंथ असून त्यांची हस्तलिखिते पुरातत्व विभागांकडे व सांप्रदयिक मठांत पडून आहेत. वैदिक साहित्याचा जेवढा अभ्यास झाला व होतोही आहे तेवढाच काय त्याच्या अल्पांशानेही तंत्रशास्त्रांचा झाला नाही हे वास्तव आहे. तंत्रशास्त्रांना आगम (आधीचे) तर वैदिक साहित्यला "निगम" (नंतरचे) असे म्हणण्याचा प्रघात आहे. तांत्रिक धर्माला आगमिक धर्म म्हटले जाते. तंत्रांच्या शाखाही खूप आहेत. आगमिक धर्मग्रंथ वेदांना मान्यता देत नाही. सुफलताविधी हा तंत्रांचा पाया असून शिवलिंग, मातृदेवता, वृषभादि प्रजननशक्तीशी संबंध असलेली दैवते तंत्रशास्त्रात प्राधान्याने येतात. तंत्रांचा उगम सिंधुकाळात आहे असे डा. सुधाकर देशमुख आपल्या "मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास : तंत्र, योग आणि भक्ती" या ग्रंथात साधार दाखवून देतात. उत्खननांत तसे पुरावेही विपूल प्रमाणात सापडलेले आहेत. नाथ पंथही तांत्रिकच जो वेद व चातुर्वर्ण्य मानत नव्हता. सांख्य, वैशेषिक तत्वज्ञानही तंत्रशास्त्रांवर आधारित आहे.
थोडक्यात वैदिक धर्म व हिंदू तथा आगमिक धर्म हे मुलत:च भिन्न आहेत. व्यवहारातही तो स्पष्ट जानवतो. संघाला हिंदुंचे राष्ट्र नव्हे तर वैदिकश्रयी "वैदिक राष्ट्र:" आणायचे आहे. म्हणून ते वेदांनाच भारतीय संस्कृतीचा मुलस्त्रोत मानतात. त्यापेक्षा पुरातन असलेल्या आगमिक तंत्र ग्रंथांचे साधे नांवही घेत नाहीत. सिंधू संस्कृतीचे निर्माते "वैदिक आर्य" होते हे सिद्ध करण्याची तर अहमहिका सुरु आहेच. खरे तर त्यांनी सिंधू संस्कृतीला हिंदू संस्कृती म्हणायला काही प्रत्यवाय नव्हता कारण मुळात हिंदू हे नावच सिंधुवरुन आलेले आहे. पण जेथे जेथे सांस्कृतिक वर्चस्वाचा संबंध असतो तेथे वैदिक महिमान गायले जाते. आगमिक शास्त्रे वेदपुर्व असुनही त्यांना मात्र साधे विचारातही घेतले जात नाही. त्यामुळे त्यांना "हिंदू भारत" अभिप्रेत आहे कि "वैदिक भारत" हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.
हिंदुंना भारत वैदिकस्थान होणे परवडणारे नाही. यात त्यांचा इतिहास, त्यांच्या गौरवगाथा पुर्ण नाहिशा होण्याचा संभव आहे. हिंदुंना चवथ्या वर्णात टाकणारी व हीण स्थान देणारी ही वैदिक व्यवस्था हिंदूनी मान्य करणे शक्य नाही. आदिम हिंदू परिषद या वैदिक सोंगाचा विरोध करते ते यामुळेच!

-Sanjay Sonawani

No comments: