Monday, April 3, 2017

कोणते असूर कोठले?

येथे हे स्पष्टपणे लक्षात ठेवणे गरजेचे आहे कि ऋग्वेदातील असूर (देवता म्हणून उल्लेख असतील किंवा शत्रू म्हणून) हे भारतीय पुराकथांतील असूर नव्हेत. ब्राह्मण साहित्यातीलही देवासुरांच्या कथा प्रचीन इराणमधील वैदिकांचा झालेला तेथील असुरधर्मियांशी (अहूर-माझ्दा धर्मियांशी) झालेल्या संघर्षाच्या कथा आहेत. वल, नमुची, शंबर, वृत्र इत्यादि जे असूर ऋग्वेदात शत्रू म्हणून उल्लेखले आहेत ते सर्वस्वी प्राचीन इराणमधील आहेत. या कथा घेऊनच वैदिक लोक भारतात आले. त्यातील असूर हे भारतातेलच उल्लेख असावेत हे समजण्याचे गल्लत विद्वानांकडून झाली व इतिहासाची कालरेखाच बदलली.

वैदिकांचा ऋग्वेदातून येणारा भूगोल सर्वस्वी आजच्या दक्षीण अफगाणिस्तानातील आहे. त्यातील काही असूर (उदा. वृत्र) तर निसर्गाची रुपके आहेत. त्या देवासूर युद्धांचा आणि भारतातील असूरांचा त्यांच्याशी संबंध नाही. ऋग्वेद व ब्राह्मण सहित्यात प्रकर्षाने आलेल्या देवासूर संग्रामांच्या पुराणकथा या अफगाणिस्तानातील देव (म्हणजे वैदिक) व असूर (म्हणजे अहूर-माझ्द्याचा धर्म पाळणारे लोक). या कथांचा येथील वैदिकांच्या झालेल्या असुरांशीच्या संघर्षाच्या कथांना एकत्रच समजल्याने भारतीय सांस्कृतिक इतिहास प्रदुषित झाला आहे याची नोंद विद्वानांनी घेतलेली नाही. परंतू आपण आपला सांस्कृतिक इतिहास पाहतांना कोणता मानवी समुदाय कोठला हे तपासले नसल्याने व कोणत्या पुराकथा कोणत्या भौगोलिक क्षेत्रात रचल्या गेल्या याचा अदमास न घेतल्याने आपले आपल्याच इतिहासाबाबत पुष्कळ गैरसमज आहेत. असूर संस्कृतीच्या विस्ताराचाही आपल्याला अंदाज आला नाही. भारतातील असुरांबाबत आपल्याला जी माहिती त्रुटित व प्रदुषित स्वरुपात मिळते ती पुराणांतुन, महाभारतातुन व काही प्रमाणात ब्राम्हण ग्रंथांवरून. त्यातही वैदिक पुराकथांतून झिरपलेल्या कथांची येथील असुरांशी केलेली सरमिसळ हेही समजावून घ्यावे लागते. बळीचेच उदाहरण पुरेसे आहे. विष्णु तीन पावलांत आकाश आक्रमितो या वैदिक ऋचेवरुन फार पुढे वामनाने (म्हणजेच विष्णुने) बळीकडे मागितलेले तीन पावलांचे वरदान ही कथा बनवण्यात आली. प्रत्यक्षात ते खरे नाही हे वेगळे सांगायची गरज नाही. असुरांच्या मुळच्या भारतीय कथांवर अनेक पुटे शत्रुभावनेने चढवली गेली असली तरी त्यातून आपण भारतीय असुरांचा इतिहास शोधू शकतो तसेच अफगाणिस्तानातील (प्राचीन इराण) असुरांचाही. हा फरक का हे जोवर आपण ऋग्वेद व अवेस्त्याचा भुगोल समजावून घेत नाही तोवर समजणार नाही.
ऋग्वेदातील देव-असुरांच्या कथांवरुन आर्य भारतात आल्यावर येथील ज्या जनसमुहांशी संघर्ष झाला त्याचेच चित्रण त्यात असावे असा समज बहुतेक विद्वानांचा होता. इतकेच नव्हे तर दास, दस्यू या येथील मुळ जमाती होत्या असाही समज होता. भारतातील अनेक बहुजनीय विद्वानांचा हा समज अद्यापही आहे. या समजापोटी आपण स्वत:चीच भावनिक व सांस्कृतिक फसवणूक करुन घेतली. न्य़ुनगंडाचे रोपटे मनात रुजले. हिंदू म्हणजे आर्यांकडून हरलेली एतद्देशिय रानटी जमात, विजेत्या आर्यांनीच जातीसंस्था लादली व दास्यात लोटले वगैरे मते हिंदुंच्या मानसिक विकासात अडथळा ठरली. परंतू दास-दस्यु या भारतातील नव्हे तर प्राचीन इराणमधील समाज होते व आजही या समाजांचे अवशेष तिकडे अस्तित्वात आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. हिंदुंचा पराभव रणांगणावर झालेला नसून वैदिकीकरण झालेल्या साहित्यामुळे व पुढे तेच खरे मानण्यामुळे झाला हे लक्षात ठेवले पाहिजे.

-Sanjay Sonawani

No comments: