Sunday, April 9, 2017

गोळवलकर गुरुजींचे "वैदिक राष्ट्र"

Image result for golwalkar and fourfold social system

श्री. मा. स. गोळवलकरांचे "We or Our Nationhood Defined" हे पुस्तक "वैदिक राष्ट्र" संकल्पनेशी निगडित आहे. हिंदू नांव ते घेत असले तरी हिंदुंना वैदिकांच्याच गुलामीत ठेवण्याचे त्यांचे स्वप्न होते. वर्णव्यवस्थेचा व जन्माधारित जातिव्यवस्थेचा ते गौरव करत. त्यांना इतिहासाचे ज्ञान तर नव्हतेच पण पुस्तक लिहिले तेंव्हा सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडुन वीसेक वर्ष उलटुन गेलीत याचेही भान नव्हते. 

वैदिक सांस्कृतिक माहात्म्य सांगतांना ते हजारो वर्षांचा कालविपर्यास ते बिनदिक्कतपणे करतात. उत्तर ध्रुवावर आर्य जन्मले हे मान्य करत ते म्हणतात की उत्तर ध्रुव त्या काळी बिहार-ओरिसामद्धे होता व सरकत सरकत नंतर तो आता आहे तेथे गेला! (भुविज्ञानशास्त्रज्ञांनो आत्महत्या करा!) 

धर्मांतरांबाबत मुस्लिमांना दोष देतांना येथले आजचे "अशरफ" म्हणून मिरवणारे बव्हंशी मुस्लिम हे धर्मांतरीत झालेले मुळचे वैदिक आहेत हे सांगायला ते सोयिस्करपणे विसरतात. त्यांना नेमका कोणता राष्ट्रवाद अभिप्रेत आहे हाच गोंधळ त्यांचा सुटलेला दिसत नाही हे तर आहेच पण राष्ट्र म्हणजे नेमके काय व ते कसे बनते याबाबत अत्यंत बाळबोध संकल्पना ते सांगतात. परकीयांनी येथले राष्ट्रीयत्व स्विकारायचे असेल तर येथील धर्म/भाषा/संस्कृतीशी त्यांनी एकरूप व्हावे असे ते म्हणतात. तसे नसेल तर कोणतेही नागरीकाधिकार त्यांना न देता दुय्य्म नागरिकत्व द्यावे असे ते म्हणतात. 

ते वंशवादी होते हे तर सर्वांना माहितच आहे. त्याचा प्रत्यय या पुस्तकात येतो. नाझी जर्मनीकडून भारताने शिकावे असा सल्लाही ते देतात. वंश, भाषा, धर्म, संस्कृती आणि भाषा हे राष्ट्राचे आ्धारस्तंभ आहे असे ते म्हणतात पण मग आपल्या मुदलातच खोट आहे हे त्यांच्या (व संघींच्या) लक्षात येवू नये हे दुर्दैवी आहे. यातील एकही मुद्दा भारतात टिकत नाही व टिकणारही नाही...म्हणजे भारत हे "राष्ट्र" या अर्थाने राष्ट्रच बनू शकत नाही...असे त्यांचीच व्याख्या सिद्ध करते. केवळ मुस्लिम वा बाह्य प्रदेशांत जन्मलेल्या धर्म व धर्मियांचे दमन केले म्हणजे झाले राष्ट्र असा बा्ळबोध समज त्यांचा दिसतो. पण मुळात वैदिक धर्मच या भुमीत जन्मलेला नाही, मग त्याचे काय करायचे, याचे उत्तर गोळवलकर भक्त देत नाहीत. 

एक बालीश पण विघातक स्वप्न यापलीकडे या पुस्तकाची तशी किंमत नाही. पण ते काहींचे "बायबल" असल्याने त्याची दखल घेणे क्रमप्राप्त होते. ही सामाजिक व सांस्कृतिक मोडतोड आदिम हिंदू परिषदेला मान्य नाही. वैदिक धर्म हा हिंदू धर्माचा भाग आहे हे सिद्ध करणारे कोणतेही पुरावे नाहीत, एवतेव संघाने हिंदुंचे नांव घेत वैदिक धर्माचे स्तोम माजवणेही पसंत नाही.

-संजय सोनवणी

No comments: