Sunday, April 2, 2017

वैदिककेंद्री इतिहास चुकीचा!

आर्य आक्रमण सिद्धांत ग्राह्य धरला गेल्याने व त्यापुर्वी भारताला इतिहासच नाही हे गृहित धरल्याने भारतीय पुराइतिहास हा वैदिक काळ, ब्राह्मण काळ, उपनिषद काळ व पुराण काळ असा विभाजित झाला. यामुळे झालेली हानी अशी कि केवळ वेदांत जे असूर अथवा देव उल्लेखले गेले आहेत तेच प्राचीन मानत नंतरच्या शिवादि देवता व हिरण्यक्षादि असूर व अन्य समाजघटक पौराणिक म्हणजे नंतरचे ठरवण्यात आले. त्यामुळे इतिहासाची कालरेखाच चुकीच्या गृहितकावर बदलली गेली. परंतू सर्वांचाच इतिहास एकत्र पाहिला व तुलना केली तर कालरेखा अत्यंत विसंगत होऊ लागते याचे भान आजवरच्या विद्वानांनी ठेवले नाही. वेद मुळात भारतात रचलेच गेलेले नसल्याने त्यात भारतीय इतिहासाचे समांतर अथवा पुरातन उल्लेख येणे शक्य नाही. याचा अर्थ भारताला इतिहास नव्हता असेही नाही. सिंधू संस्कृतीने ते सिद्ध केले. पुराकथांतून तो इतिहास असणारच व तो त्रुटित असला तरी शोधला पाहिजे याचे भान विद्वानांनी ठेवले नाही. सिंधू संस्कृती नंतर सापडल्यावर विद्वानांच्या लक्षात ही अडचण आली असली तरी ती मान्य न करता 
सिंधू संस्कृती ही वैदिक आर्यांचीच निर्मिती असे मानत ऋग्वेदकाळ मागे नेण्याची शर्यत सुरु झाली. 

पण प्रत्यक्षात वैदिक काळापुर्वीपासुनचा समृद्ध इतिहास भारताला होता. ज्यांना त्यांनी पौराणिक ठरवले ते असूर व राम-कृष्णादि महनीय पुरुष हे भारतात वेदपुर्व व समांतर काळात घडले. भारतात त्यांचा इसपू १००० पर्यंत प्रवेशच झालेला नसल्याने  व अगदी भारतातही पसरायला त्यांना पुढची काही शतके लागल्याने भारतीय इतिहास हा वैदिक इतिहास असू शकत नाही. वैदिकांचे आगमण होण्यापुर्वीच शिवादि देवता भारतात प्रस्थापित झाल्या होत्या याचे इसपू २६०० पासुनचे सलग पुरावे उपलब्ध आहेत. भारतातही असूर व यक्ष संस्कृती तेंव्हापासुनच गंगेच्या खो-यात अस्तित्वात होती. शिवशक्ती आधारित तंत्रे व सांख्यादि तत्वज्ञानांची निर्मिती तेंव्हापासुनचीच. काही उपनिषदे ही वेदपुर्व काळातील असुन काही नंतर वैदिक तत्वज्ञानाचा विरोध करायला निर्माण झाली. त्यांचा वेदांशी संबंध असला तर असा आहे. ती वेदांचा भाग नाही. 

भारतावर आर्य आक्रमण झालेले नसुन ऋग्वेदरचनेच्या काळातच काही वैदिकांना भारतात विस्थापित होणे कसे भाग पडले याची कथा आपल्याला शतपथ ब्राह्मणात विदेघ माथवाच्या पुराकथेतुन स्पष्ट होते. त्यामुळे हिंदुंचा इतिहास पुन्हा लिहिणे व कालरेखा सुसंगत करुन घेणे महत्वाचे आहे. वैदिककेंद्री इतिहास लेखन वास्तवास धरून नाही.

No comments: