Saturday, April 8, 2017

असा भारतात आला वैदिक धर्म!

भारतात वैदिक धर्माचा प्रवेश विदेघ माथवाच्या व त्याच्या सहकारी-अनुयायांच्या माध्यमातून सरासरी इसपू १२०० ते इसपू हजार या काळात झाला. त्यांनी जरी पहिली वस्ती सिंध प्रांतात केली असली तरी त्यांना राजाश्रय मिळाला तो कुरु-पांचालांचा. शतपथ ब्राह्मणात ही प्राचीन दंतकथा जपून ठेवली असून त्यावरून यांची पहिली वस्ती सदानीरा नदीकाठी पानथळ परिसरात आधी झाली असे दिसते. हा परिसर शूद्र नामक जमातीच्या राज्यात झाला. या जमातीबद्दल अलेक्झांडरच्या इतिहासकारांनीही लिहिले आहे. अलेक्झांडरशी त्यांचेही युद्ध झाले होते. महाभारतातही या शूद्र जमातीचा तीनदा उल्लेख येतो. हे नांव भारतातील अन्य समुदायांना चिकटवले गेले असले तरी ते वास्तव नाही. शूद्र टोळी एके काळी बलाढ्य असून अभिरांसोबतच तिचे नांव अनेकदा घेतले जाते.
शतपथ ब्राह्मणातील ही पुराकथा अशी : विदेघ माथव हा सरस्वती नदीच्या तीरावर राहत होता. आपला पुरोहित गौतम राहुगण आणि अग्नी सोबत घेऊन तो पर्वत (उत्तर गिरी) नद्या व अरण्ये ओलांडत सदानीरा नदीपर्यंत आला. आता कोठे वसायचे असे विचारल्यावर अग्नीने त्याला या नदीच्या पुर्वेकडे वसती कर असे सांगितले. (पहा शतपथ ब्राह्मण १.४.१, १४-१७) शतपथ ब्राह्मणाच्या या पुराकथेवरून दक्षीण अफगाणिस्तानातील सरस्वती (हरक्स्वैती) नदीपासून कोणत्यातरी अज्ञात कारणाने (बहुदा राजकीय घडामोडींमुळे. पारशी धर्माचे आक्रमण हेही कारण असू शकते. कारण वैदिक धर्म आपल्या जन्मस्थळी पुर्ण संपला हे ऐतिहासिक वास्तव आहे.) वैदिक धर्मियांचा एक गट उत्तरगिरी (हिंदुकूश पर्वत) व अनेक नद्या जंगले ओलांडत एका नदीजवळ आला, तेथे वस्ती केली व त्या नदीला सदानीरा नदी हे नांव दिले. हा प्रदेश शुद्रांच्या राज्यात मोडत होता. येथे काही काळ वसती केल्यानंतर पुढे त्यांना नंतर राजाश्रय दिला तो कुरु-पांचालांनी. मधल्या काळात व्रात्य या हरियानातील लोकांसोबतही वैदिक राहिले असे वैदिक साहित्यावरून स्पष्ट दिसते. व्रात्यांचा तेंव्हा सन्मान करणारे वैदिक नंतर त्यांचीच निंदा करतांना दिसतात. शुद्रांच्या बाबतीतही तेच झाले. हा कृतघ्नतेचा इतिहास आहे.

1 comment:

Kamalakar Ayare said...

पाहुण्यांनी (उपरे/आश्रीत) सन्मानीत केले तरच ऐतद्देशीय श्रेष्ठांचा अहंगड शमला जायचा, हे विपरीत नाही का, त्यांना एवढे डोक्यावर बसवायला ईथलेच लोक कारणीभुत नाहीत काय, अजुनही आपण तोच कित्ता गिरवत असु तर ते चुकीचेच ठरेल.