Friday, April 28, 2017

हिंदुंना वर्णव्यवस्था लागू नाही!

शूद्र-अतिशूद्र म्हणजे जे वैदिक धर्माचे नाहीत त्यांना वैदिक लोक शूद्र म्हणत असत. त्यांचा धर्म वेगळा. मुस्लिम जसे काफिर शब्द अन्य धर्मियांना वापरतात तसाच हा शूद्र शब्द. आपल्या धर्माला प्राचीन काळी "आगमिक" असे नांव होते. सातवाहनही स्वत:ला "आगमान निलया" (आगमांनुसार चालणारे) म्हणवून घेतात. हे आगमिक म्हणजेच हिंदू होत. वैदिक धर्मीय स्वत:ला वैदिक अथवा सनातन धर्माचे लोक म्हणवत असत. वैदिकांनी ज्यांना शूद्र म्हटले त्या शूद्र राजांचीच परंपरा मोठी आहे. ज्ञात इतिहास शिशुनाग वंशापासून सुरु होतो. तो व नंद घराण्यापासून ते यादव घराणे शूद्रच राजघराणी होती. शिवाजी महाराजांनाही शुद्रच (म्हणजे परधर्मीय) मानले गेले होते. भारतात झालेले वैदिक राजे दोनच. शृंग आणि काण्व. वैदिक धर्म वेगळा आहे तर मुर्तीपुजकांचा आपला धर्म वेगळा आहे. वैदिकांनी परधर्माचे म्हणून हलके लेखण्यासाठी शूद्र/क्षुद्र असा भ्रम निर्माण केला. पण ते वास्तव नव्हते. मनुस्मृतीनुसार शुद्राला साधे चांगले कपडे घालायलाही परवानगी नाही, मग शूद्र राजे कसे झाले बरे? हा विचार हिंदुंनी केला नाही. दहाव्या शतकानंतर आर्थिक अवनतीच्या काळात अकारण न्युनगंड वाढवला गेला. संस्कृती व इतिहासच विसरल्याने आजही हा न्युनगंड हिंदुंत कायम आहे. त्यातून बाहेर पडणे हे हिंदुंसमोरील पहिले कार्य आहे.

आपण "वैदिक" हा शब्द जेंव्हा वापरतो तेंव्हा त्यात ब्राह्मण, क्षत्रीय व वैश्य हे तीन वर्ण येतात. क्षत्रीय नसूनही क्षत्रीय असल्याचे समजत तशी वर्ण अथवा जातीश्रेष्ठत्वता मिरवणारेही त्यात येतात. वैदिक म्हणजे फक्त ब्राह्मण नाही. हे तिन्ही मिळून वैदिक होतात. वैदिकत्व सोडणारेही अनेक आहेत, त्यांचा आपण सन्मानच करतो. त्यांचा धर्म सर्वार्थाने वेगळा कसा हे हे समजावणे व आत्मभान मिळवत स्वत:चा धर्म समजावून सांगणे हा आपला मुख्य उद्देश्य आहे. थोडक्यात वैदिकांनी ज्यांना शुद्र, अतिशुद्र व आदिवासी असे लेबल दिले हेच मुळचे हिंदू असून बाकी वैदिक आहेत. त्यांच्या हिंदुंमधील हस्तक्षेपामुळे हिंदुंचे अतोनात नुकसान झाले आहे. आता ते होऊ न देणे हे काम आपणा सर्वांना करावे लागेल.

हिंदू हे वैदिक धर्माचे नसल्याने उच्च्घनीचतेचे वैदिक नियम अथवा वर्णव्यवस्थाही त्यांना लागू पडत नाही. जाती म्हणजे व्यवसाय. सर्व जातींचा (म्हणजे व्यवसायांचा) समतेच्या पातळीवर सन्मान करणे हा हिंदू धर्माचा गाभा सर्व तंत्रशास्त्रांनी सांगितला आहे. या जन्मीची जात ही गेल्या जन्मातील पापाची परिणती हा वैदिक सिद्धांत बोगस आहे, मुळात वैदिक धर्मग्रंथांतही हा सिद्धांत नाही. उत्तर काळत, म्हणजे पार अकराव्या शतकात स्वार्थी वैदिकांनी तो निर्माण केला. पण त्याला प्राचीन वैदिक धर्मग्रंथांचा आधार नाही. या सिद्धांताला ठोकरून लावा. स्वत:च्या धर्माप्रमाणे वागायला शिका.

-Sanjay Sonawani

No comments: