Monday, April 3, 2017

वैदिक धर्मप्रसारासाठी रामाचा वापर!

सुर्यवंशी म्हणजे असूर समाजाचा राम. त्याचे वैदिकीकरण कसे झाले याचा अंदाज खालील थोडक्यात दिलेल्या माहितीवरुन येइल. 

असूर म्हणवनारे लोक हे भारत ते मेसोपोटेमियापर्यंत पसरलेले होते. असूर हीच त्यांची मुख्य देवता होती. असूर हे सुर्याचेच संबोधन होते. सुर्य हा मानवी जगाचा अदिम काळापासून केंद्रबिंदू असणे स्वाभाविक आहे. काही समाजांनी आपल्या दैवत रचनेत त्यालाच केंद्रवर्ती स्थान दिल्याने त्याच्या भवती जी संस्कृती केंद्रित झाली तीच असूर संस्कृती होय.
असूर संस्कृतीचा मध्यपुर्वेतील काळ हा उपलब्ध पुराव्यांनुसार इसपू तिस-या सहस्त्रकात सुरु होतो. असूर राज्यकर्त्यांमुळे असुर-प्राधान्य त्यांच्या धर्मात आले हे उघड आहे. ते लोक सुर्यपुजक होते व सुर्यालाच असूर म्हणत. इराणमधेही त्याच कालात असूर ही मुख्य इष्ट देवता होती. तेथेही असूर (अहूर) या शब्दाचा अर्थ सूर्य असाच असल्याचे मेरी जोईस व अखिलेश चंद उपाध्याय यांनी स्पष्ट केले आहे. भारतातही असूर शब्दाचा अर्थ सुर्यच होत होता. बिहार-ओरिसामध्ये असुरांची राज्ये पुरातन काळापासून (किमान सनपूर्व ३०००) होती. या भागात आजही सूर्यपूजा उत्सवाप्रमाने साजरी तर होतेच पण सनपुर्व ५०० पासुनची जी नाणी मिळाली आहेत त्यावरही सूर्य प्रतिमाच अंकित करण्यात आली आहे.
राम सुर्यवंशात जन्मला हे सर्वमान्य आहे. त्याच्या वंशाला इक्ष्वाकू म्हणतात व हा शब्दही सुर्यालाच दिला गेलेला एक प्रतिशब्द आहे. असूर शब्द जगातील अनेक भाषांत असला तरी समानार्थीच वापरला गेलेला आहे. त्यामुळे राम सुर्यवंशात जन्मला असे आपण म्हणतो तेंव्हा त्याचे मुळचे असुर मुळ अधोरेखित होते हे आपण आपण लक्षात घेतले पाहिजे. आजच्या रामायनातील खुपशा कथा भारतीय इतिहासाचे वैदिकीकरण करण्याच्या नादात निर्माण झाल्याने रामकथेत वसिष्ठ-विश्वामित्रादि वैदिक ऋषी येतात म्हणून रामही वैदिक क्षत्रीय असला पाहिजे यावर आपला सहज विश्वास बसतो. पण ऋग्वेदातील महत्वाचे लेखक ऋषी अयोद्येच्व्ह्या परिसरात आलेच कसे हा विचार आपण केलेला नाही. ऋग्वेदाची बव्हंशी रचना झाली ती दक्षीण अफगाणिस्तानात. वैदिक भारतात आते ते प्रथम सिंध प्रांतात. तेथून मग कुरु-पांचालात. आणि मग तेथून ते गंगेच्या खो-यात गेले. हा काळ काही शतकांचा आहे. राम तत्पुर्वीच होऊन गेला होता व वसिष्ठादि वैदिक ऋषी तेंव्हा जीवंत असण्याची व भारतात कधी आल्याचीही शक्यता नव्हती. त्यांच्या ऋचांतून त्यांचा काळ हा ऋग्वेदरचनेचा आदि ते मध्य काळ आहे, म्हणजे इसपू १५०० ते इसपू १२०० आहे. तेंव्हा ते व त्यांचे वंशज अफगाणिस्तानातच होते. मूळ रामकथा इसपू १००० पुर्वेची आहे. शिवाय वाल्मिकी कोळी होता. भारतात गंगेच्या खो-यात प्राचीन काळात तीनच व्यवसाय महत्वाचे होते व ते म्हणजे मासेमारी, पशुपालन आणि शेती. लाखेरी येथील उत्खननात इसपू दोन हजारमधील सापडलेल्या अवशेषांनी ही बाब पक्की केली आहे. कोळ्याचा व्यवसाय तेंव्हा अवमानजनक असण्याची शक्यता नाही. वैदिक तर भारतात आलेलेच नव्हते. त्यामुळे रामकथा लिहिणारा मुलचा वाल्मिकी कोळी असण्यात काही वावगे नाही. पण या कथेवर वैदिक "साज" गुप्तकाळात चढवत रामाला पार वैदिक बनवून टाकले, पण वाल्मिकीलाही एकाच वेळीस कोळी आणि वैदिक गोत्रीही बनवून टाकले.
त्या काळात कोणती कालगणना होत होती हे कोणालाही माहित नाही. नवमी ही नंतर चवथ्या शतकात बनवलेली काल्पनिक तिथी आहे हे उघड आहे. सत्य हे दिसते कि राम हा सूर्यवंशी म्हणजे असूर समाजातील होता. त्याचे कथा लोकप्रिय असल्याने त्या कथेवर वैदिक साज चढवले गेले. हे फक्त वैदिकांनी केले असे नाही तर जैनांनी त्यांच्या रामायणात व बौद्धांनी दशरथ जातकात आपापले धर्ममाहात्म्य वाढवण्यासाठी केले. मुळ रामायण मात्र शोधावे लागते.

Please clich here to know more -http://ssonawani.blogspot.in/2014/05/ramayana-story-behind-story.html

-Sanjay Sonawani

No comments: