Sunday, April 2, 2017

वैदिक हे हिंदू नव्हेत

"हिंदू" हा शब्द सर्वप्रथम प्राचीन पारशी धर्मग्रंथ अवेस्त्यामध्ये उल्लेखलेला आहे. या पारशी धर्मग्रंथातल्या संदर्भानुसार "हिंदू" हे संबोधन पुर्वेकडील सिंधु नदिच्या खोर्यात राहणार्या लोकांसाठी वापरला जातो. अवेस्त्याच्या काळात किंवा त्याच्याही हजारों वर्षांआधीपासुनच सिंधु नदीच्या खोर्यातले लोक लिंगपुजक किंवा प्रतिमापुजक होते, याचे अगणित भौतिक पुरावे हडप्पा आणि मोहेंजोदारो येथील उत्खननात सापडलेले आहे! म्हणुनच आजच्यानुसार सिंधु संस्कृतीचे लोक शैव/शाक्त लोकधर्माचे होते . म्हणजेच अवेस्त्याचे हिंदू हे संबोधन या सिंधु खोर्यातल्या लिंगपुजक/प्रतिमापुजक लोकांसाठी होते!

पारशी लोकांच्या अवेस्त्यात असलेला हिंदू शब्द व त्यांच्यासाठी अभिप्रेत असलेला त्याचा अर्थ याचे त्यांच्याच शेजारी जवळच्या प्रदेशात असणार्या वैदिक लोकांशी काहीच देणेघेणे नाही . तसेच वैदिक लोकांसाठी हिंदु शब्दाचा अवेस्त्यात असलेला मुळ अर्थ अभिप्रेत नव्हता . म्हणुनच ॠग्वेदात सिंधु या शब्दाचा अर्थ नदीच्या संदर्भात येतो. इराणी पारशी टोळ्यांच्या नजिकच्या प्रदेशात असुनसुद्धा वैदिक टोळ्यांना सिंधु नदीच्या खोर्यातल्या प्रदेशाबद्दल प्रारंभी काहीच माहित नव्हते कारण त्यांच्या समाजात व्यापार करणारे वर्ग नसत. वैदिक टोळ्यांसाठी तो काळ धार्मिक, सांस्कृतिक तसेच राजकीय संघर्षाचा आणि उलथापालथीचा होता . इराण, अफगाणिस्तान या भागात वैदिक टोळ्यांचे पारशी व इतर अनेक टोळ्यांशी लहान मोठे संघर्ष होत असत. काळानुसार त्या भागात पारशी (झोरोएस्ट्रियन) धर्माचे प्राबल्य वाढल्यावर मात्र वैदिक टोळ्यांना तिथुन स्थलांतर करुन दुसरीकडे वस्ती करणे भाग पडले. त्यानुसार वैदिक लोकांनी पुर्वेकडच्या प्रदेशाकडे आपला वळवला. या वैदिक लोकांचे सिंधु नदीच्या प्रदेशाजवळ आगमन झाले तेव्हा त्यांना या प्रदेशाबद्दल काहीच माहित नव्हते. 


आपल्या उदरनिर्वाहासाठी आपल्या यज्ञधर्माच्या प्रसारासाठी या सिंधुखोर्यातल्या लोकांबरोबर त्यांनी काही काळ मित्रता केली,  पण नंतरच्या काळात त्या सिंधुजनांची व त्यांच्या धर्मकल्पनांचा अपमानच केलेला आढळतो. वैदिक लोक सिंधु जनसमुहांना त्यांच्या व्यवसायानुसार वा काही वेळा अपमानाने पणि, असुर, अनार्य, शूद्र आणि दास-दस्यु म्हणत असतं, यांपैकी असुर आणि दास-दस्यु या शब्दांचा वापर वैदिक लोक आपल्या नवीन शत्रुसाठी पुर्वीच्या पारशी लोकांबरोबर असलेल्या शत्रुत्वामुळे निर्माण झालेल्या पुर्वग्रहदुषित भावनेने वापरले आहेत. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी की ऋग्वेदापासुन ते इतर स्मृतिग्रंथांपर्यंत कोठेही वैदिकतेरांसाठी हिंदू शब्दाचा प्रयोग होताना दिसत नाही! बाकी पुढे कित्येक शतकांनंतर इराण आणि अफगाणिस्थानात इस्लामी टोळ्यांनी आक्रमण केले म्हणुन तेथील पारशींना आपला भुप्रदेश सोडुन भारतात आश्रयासाठी यावे लागले, हा इतिहास सर्वज्ञातच आहे. 

पारशींनी आपल्या प्राचीन अवेस्तन भाषेत हिंदू शब्द जतन केला होताच हा शब्द नंतरच्या इस्लामी शासकांनी भारतात राहणार्या गैरइस्लामिक लोकांसाठी वापरला. प्रत्यक्षात तेव्हा भारतात शैव ,जैन, बौद्ध, वैदिक (आणि वैष्णव) असे कित्येक धर्मांचे कमी जास्त प्रमाणात अस्तित्व होते . त्यावेळच्या मुस्लिम आक्रमकांना भारतातल्या विविध धर्मांची व त्यांच्यातल्या परस्पर मतभेदांची आणि संघर्षाची कल्पना नव्हती. पर्शियन (इराणी) भाषेच्या प्रभावामुळे त्यांनी भारतातल्या सर्व जाती-जमाती आणि धर्मांना "हिंदू" नाव दिले. नंतर कित्येक शतकांनंतर पुन्हा भारतावर यूरोपियनांचे आगमन झाले. 

मग पुढे ब्रिटिश सत्तेचे पाय रोवल्यावर त्यांनी जाती आणि धर्माच्या आधारे भारतात सर्वेक्षण केले होते . भारतीय समाजात फुट पाडण्याच्या स्वार्थी हेतुपायी का होईना ब्रिटिश आणि इतर यूरोपीय विद्वानांना भारतातील वैदिक व वैदिकेतर यांमधील संघर्ष माहित होता कारण वैदिक धर्मग्रंथे व स्मृतिपुराणांचा शास्त्रशुद्ध अभ्यास पाश्चिमात्य विद्वानांनी केला होता. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात भार प्रत्येक धर्म आणि त्याचे चाहते त्यांच्या धर्माचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न करत होते जशी मुस्लिमांसाठी मुस्लिम लीग स्थापन झाली तशी बाकी मुळ हिंदूंवर आपले धार्मिक व सांस्कृतिक वर्चस्व स्थापित करण्यासाठी तसेच मुस्लिम लीग आणि ब्रिटिशांना तात्पुरता विरोध म्हणुन हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांसारख्या संघटना स्थापन झाल्या. या संघटनांनी हिंदू या शब्दाचा गैरवापर आपल्या राजकीय फायद्यासाठी आणि मुस्लिम व ख्रिस्ती यांच्या विरोधात एक प्रभावी अस्त्र म्हणुन केला.

अशा प्रकारच्या संघटना आणि त्यासंबंधी व्यक्ती या आजही अनेको वैदिकेतर सांस्कृतिक परंपरांना त्यांच्या ऐतिहासिक ठेव्यांना वैदिक परंपरा म्हणुन गौरवु पहात आहेत. "हिंदू" या शब्द ज्याप्रमाणे पारश्यांनी ज्यांच्यासाठी वापरलेला होता त्यानुसार वैदिक लोक हे कधीही हिंदू ठरत नाहीत, हे सत्य जाणुनबुजुन काही स्वतः ला हिंदुत्ववादी म्हणवुन घेणारी मंडळी लपवण्याचा प्रयत्न करत असतात. खरेतर भारतासारख्या अनेको धर्म असलेल्या देशामध्ये धर्मांच्या विविधतेमुळे वैदिक आणि  हिंदू यांमधील धार्मिक आणि सांस्कृतिक संघर्षांची चिन्हे जागतिक समाजमनाला व काही जागतिक अभ्यासकांना दिसत नाहीत. तथाकथित हिंदू म्हणुन ओळखल्या जाणार्या या बहुसंख्यक भारतीय समाजामधले असलेले प्राचीन काळापासुनचे धार्मिक आणि सांस्कृतिक संघर्षाचे खरे रुप जगासमोर आणण्यासाठी मोठी साहित्यिकीय चळवळ उभी करावी लागणार आहे जेणेकरुन हिंदू शब्दाचा वापर राजकियदृष्ट्या करणार्या वैदिक धर्माभिमानी गटांचे पितळ जगापुढे उघडे पाडता येईल.


-Yash Mahalim

No comments: