Sunday, April 2, 2017

वैदिकवादी संघ

संघाला भारतीय घटना मान्य नाही हे जगजाहीर आहे. याचे कारण लोकशाहीचे मुल्यच त्यांना मान्य नाही. घटनेने स्वातंत्र्य-समता-बंधुता या महनीय मुल्यांचा स्विकार जो केला आहे तोही त्यांना मान्य नाही. समतेऐवजी ज्यात व्यक्तीचे स्वतंत्र व्यक्तित्वच उरत नाही अशी समरसता त्यांना हवी आहे. किंबहुना हाच वैदिक तत्वज्ञानाचा गाभा आहे.
 "आपल्याकडेही जाती बनल्या पण एक जातीने दुस-या जातीशी संघर्ष करण्याचा विचार केला नाही. वर्णांची संकल्पना ही विराट पुरुषाच्या चारी अंगांशी केली गेली. या चार अंगांत, म्हणजे डोके, हात, मांड्या व पाय, यात संघर्ष नसून एकात्मता आहे. परस्परपुरक असणे व एकात्म असणे हेच जीवन व्यवहाराचे मानदंड असून ते साधणे व परस्पर संघर्ष टाळण्याची वृत्ती जोपासणे महत्वाचे आहे" असे दीनदयाळ उपाध्याय (एकात्म मानव दर्शन) म्हणतात. 
त्यांना वर्णीय उतरंडीच्या विषमत: व जातनिहाय उच्चनीचता मान्य आहे. गोळवलकर गुरुजीही वर्णव्यवस्था आणि जन्माधारित जातिव्यवस्थेचे खंदे समर्थक होते. थोडक्यात घटनेची मुलतत्वेच मान्य नाहीत. याबद्दल आजकाल प्रकट बोलणे टाळले जात असले तरी हे तत्वज्ञान वरीष्ठ संघ सेवकांना चांगलेच पाठ असते व मान्यही असते. हे तत्वज्ञान आम्हाला आज मान्य नाही असे संघाने कधी घोषितही केलेले नाही.
एवढे वैदिकत्व संघात ठासून भरलेले असुनही असंख्य हिंदू केवळ "हिंदुत्व" या शब्दाला बळी पडून संघवासी होतात व हिंदू धर्माची मुलतत्वे पायतळी तुडवतात हे केवळ अज्ञानाने घडते. धर्माचे अज्ञान हा हिंदुंच्या प्रगतीतील मोठा अडथळा आहे.

-Sanjay Sonawani

No comments: