Thursday, May 4, 2017

हिंदुंचे पुरातन धार्मिक ग्रंथकोणा व्यक्तिप्रणित (अथवा विशिष्ट समुहप्रणित) तत्वज्ञान/ आचारसंहिता/ दैवतविज्ञान/ कर्मकांडसंहिता/ मान्यग्रंथ ई. वर आधारित जे स्थापन होतात व ज्यांचा प्रचार/प्रसार करावा लागतो...मग तो प्रचारकांद्वारे असो अथवा युद्धांद्वारे...त्यांना पंथ (रिलिजन) म्हणतात. या अर्थाने पाहू जाता वैदिक / पारशी/ बौद्ध / ज्यू / ख्रिस्ती/ इस्लाम इ. हे पंथ ठरतात. ते धर्म नव्हेत. वैदिक धर्माचा प्रवर्तक वसिष्ठ ऋषी व अन्य नऊ ऋषीकुटुंबे मानली जातात.

जी दैवते अथवा तत्वज्ञान अथवा कर्मकांड ही समाजाच्या एकुणातील मानसिकतेतून निर्माण होतात, को्णी एक अथवा अनेक प्रेषित/ऋषी नसतात, मान्यग्रंथ नसतो...थोडक्यात जी सामुहिक निर्मिती असते तिच्या सामुहिक प्रकटनाला धर्म म्हणतात. ईजिप्शियन/ग्रीक/अस्सिरियन/इस्लामपुर्व पेगन ई. असे सामुहिक धर्म होते. ते नि:शेष झाले. एकच टिकून राहिला तो म्हणजे ज्याला आपण आज मुर्तीपुजकांचा शैवप्रधान हिंदू धर्म म्हणतो. हा धर्म हजारो वर्ष टिकला हे त्यांचे कौतुकास्पद कार्य. वैदिक संसर्ग झाला असला तरी तो हिंदू धर्म संपवण्यात यशस्वी झाला नाही. हिंदू समाज वैदिक बनला नाही. आपल्या पुरातन परंपरा त्याने जपल्या. काळानुसार बदलही स्विकारले. हिंदू धर्माला एकमात्र धर्मग्रंथ नाही जसा वैदिकांना मान्यग्रंथ वेद आहे. कारण हिंदू धर्म हा समाजनिर्मित आहे. सुफलनाच्या आद्य मानवी भावनेशी निबद्ध आहे.न त्यामुळे हिंदुंच्य धर्मग्रंथांना सामुहिकपणे आगम ग्रंथ म्हटले जाते. तंत्रे ही याच शास्त्रांवर आधारीत आहेत व हिंदुंचा धर्म हा आजही तंत्राधिष्ठितच आहे.

वेद अथवा वैदिक साहित्य हेच हिंदू धर्माचे आद्य स्त्रोत आहेत हा भ्रम वैदिकांनी निर्माण केला. त्यामागील कारणे, स्वार्थ काहीही असोत, पण वैदिक ग्रंथ हे हिंदुंचे कधीच नव्हते हे वास्तव आहे. याचे कारण असे की वैदिक धर्मग्रंथ व कर्मकांडांपासून हिंदू नेहमीच दूर राहिले. याचा अर्थ असा मुळीच नव्हे कि शैवप्रधान हिंदू धर्माला कसलेच ग्रंथ नव्हते किंवा नाहीत. आगमग्रंथात शास्त्र, सिद्धांत, अनुष्ठान, विज्ञान, योग, आरोग्यादिंसह तंत्रशास्त्रांवर हिंदुंचे अक्षरश: लक्षावधी पुरातन ग्रंथ  आहेत. आगम म्हंणजे "आधीचे". उलट वेदांन "निगम," म्हणजे नंतरचे असे संबोधले जाते हे वास्तव समजावून घ्यायला पाहिजे. शिव-शक्ती व तंत्र साधना ही  सिंधुसंस्कृतीइतकीच पुरातन आहे हे तेथील मुद्रांवरुन सहज लक्षात येते. वेदपुर्व कालापासून तंत्र, योग आणि भक्ती या धर्म्कल्पना अस्तित्वात होत्या असे डा. सुधाकर देशमूख आपल्या "मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास : तंत्र, योग आणि भक्ती" या ग्रंथांत अनेक विद्वानांच्या साक्षी काढून सांगतात.

तंत्रांचा निर्माता शिव मानला जात असून बहुतेक तांत्रिक ग्रंथ शिव-पार्वती संवादातून साधले गेलेले आहेत. तंत्रशास्त्रांत आगम, यामल व तंत्र यांचा समावेश होतो. सृष्टीतील यात्वात्मकता मानवी जीवनाचा आधार बनवत ते सुखी व संपन्न करणे हा तंत्रांचा मुख्य उद्देश आहे. योगाच्या द्वारे शिव-शक्तीशी तादात्म्य साधणे आणि मानवी जीवात्म्याला पशुभावातून बाहेर काढणे हा उच्च आध्यात्मिक दृष्टीकोन तंत्रांचा आहे. तंत्रांतुनच सांख्य तत्वज्ञानाचा उदय झाला. तंत्रे वेदप्रामाण्य मानत नसून तंत्रे ही स्वत:तच प्रमाण आहेत, प्रत्यक्ष ज्ञान आहेत असे मानले जाते. तंत्रांत अनेक संप्रदायही असून पांचरात्र संप्रदाय महाभारत काळात अत्यंत लोकप्रिय होता असेही दिसते. हा पंथ कृष्णाच्या घराण्यात, म्हणजे सात्वतांत अत्यंत लोकप्रिय होता. पाशुपत मत सिंधू काळातही अस्तित्वात असावे असे शिवाच्या ज्या पशुपती स्वरुपातील मुद्रा मिळाल्या आहेत त्यावरुन दिसते.

तंत्रे ही अवैदिक होती व आहेत. मध्ययुगातील धार्मिक साहित्यातुनही हे मत ठळकपणे सामोरे येते. तंत्रशास्त्रांचे वैशिष्ट्य म्हणज्वे त्यात भेदाभेद नाही. स्त्री-पुरुषातील समानता हा तंत्रांचा गाभा आहे. बुद्धपुर्व काळ ते बाराव्या-तेराव्या शतकापर्यंत आगमशास्त्रांनी वैदिकांना पुरेपुर झाकोळून टाकले होते. इतके कि अनेक वैदिकही वेद सोडून तंत्रांच्या भजनी लागले. अशा मंडलींना वैदिकांनीही बहिष्कृत करुन टाकले.

तंत्र हे शिव-शक्तीशी निगडित असून ती वेदांपेक्षा पुरातन आहे. वैदिक साहित्यापेक्षाही तंत्रसाहित्याची विशालता अनेक पटीने अधिक आहे.ती अपौरुषेय अथवा अपरिवर्तनीय नसल्याने त्यांत भरही पडत राहिली. (तशी वेदांतही अपौरुषेय म्हणतात पण वेळोवेळी भर पडलेलीच आहे.) त्यामुळे तंत्रांचा विस्तारही अफाट झाला. अगदी मंदिर स्थापत्यापासुन ते पार पंचमकार साधनांपर्यंत तंत्रांचा विस्तार आहे. योग ही तंत्रांची देणगी आहे. याबाबत आपण पुढीक्ल लेखांत अधिक सविस्तर माहिती घेऊच. पण मध्ययुगात तंत्रांतील केवळ वामाचार्ताला लक्ष करत बदनाम केले गेले. पण स्वत: शिवाजी महाराज, संभाजी महाराज शाक्त होते हे वास्तव मात्र विसरले जाते. संभाजी महाराजांना बदनाम करण्यासाठी त्यांच्या शाक्त असण्याचा उपयोग केला गेला. पण तंत्र अथवा शाक्त म्हणजे फक्त वामाचार नाही, तर वामाचार ही एक उपशाखा आहे. " धर्म, कर्मकांड, विधि-विधाने, कायदा, औषधी, यातू, शेतीशास्त्र, धातू, शरीरविज्ञानशास्त्र इत्यादि धार्मिक व व्यावहारिक बाबींचा समावेश तंत्रांत होतो. डा. देशमूख उपरोक्त ग्रंथात म्हणतात की शिवशक्तीशी तादात्म्य साधने हा मुख्य उद्देश्य, व्यावहारिक गोष्टींना अधिक महत्व असलेला, तंत्र हा जीवनाकडे बघण्याचा एक्ल दृष्टीकोन आहे. ते पुढे म्हणतात की, "किंबहुना आज आपण ज्याला हिंदू धर्म म्हणतो तो वैदिक कमी आणि तांत्रिक अधिक आहे. तंत्रांचा दृष्टीकोन हा श्रौत-स्मार्त धर्माच्या विरोधात आहे." थोडक्यात वैदिक धर्म व हिंदू धर्म यांच्यात काहीएक संबंध नाही.

भग्वद्गीतेला धर्मग्रंथ मानायचे प्रथा असली तरी गीता हा अनेक तत्वज्ञानांचा संग्रह आहे. असे असले तरी गीतेवर सांख्य, योग व तंत्रांचा पुरेपूर प्रभाव असल्याने त्याला केवळ वैदिक मानता येत नाही. आणि मी पुर्वीच सांगितल्याप्रमाणे तो धर्मग्रंथही नाही. वैदिकांनी केवळ पोटार्थी भावनेने हिंदुंवर वैदिक माहात्म्य थोपण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याचा काही उपयोग झलेला दिसत नाही. कृष्ण हा सात्वतांत जन्मला व त्याच्याच काळात पांचरात्र या अवैदिक संप्रदायाचा प्रवर्तक बनला. तो कधीही वैदिक नव्हता. वास्तवात वैदिक हिंदू धर्मात लबाड्या करुनच घुसले आहेत. ही परंपरा सहाव्या शतकानंतर सुरु झाली व मध्ययुगात कळसाला गेली. वैदिकांनी आपले अस्तित्व मात्र स्वतंत्रच ठेवलेले असल्याने त्यांना कोणत्याही पुराव्याच्या आधारावर हिंदू म्हणता येत नाही.

हिंदू शब्द सिंधूवरुन आलेला आहे व सिंधू संस्कृतीपासून हिंदु धर्माचे प्रत्यक्ष पुरावे मिळत असल्याने हिंदू नावाला आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण वैदिक धर्म हा नंतर आलेला, धर्मांतराने विशिष्ट घटकांत पसरलेला वेगळा धर्म आहे, त्याचे तत्वज्ञान वेगळे आहे हे येथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

येथे वैदिक मित्राना एवढेच सांगायचे आहे कि आजही हिंदू प्रत्यक्ष तंत्रशास्त्रे अभ्यासत नसले तरी त्यांचे जीवन हे बव्हंशी तंत्रोक्तच राहिले आहे (जसे वैदिकही वेद अभ्यासत नाहीत). वैदिकांचा सन्निद्ध्यात विदेशी विद्वान आधी आल्याने त्यांचा वेदांशी आधी परिचय झाला व तेही त्याचाच पाठपुरावा अधिक करु लागले. तंत्रशास्त्रांचा आधुनिक अभ्यास जेवढा व्हायला हवा होता तेवढा झाला नाही. पण याचा अर्थ असा समजू नका कि अवैदिकांना कोणतेच धर्मग्रंथ नाहीत...उलट त्यांची संख्या वैदिक सहित्यपेक्षाही मोठी आहे. बाकी पुढील लेखांत.

No comments: